स्वकर्तव्य आणि ईश्वरप्रिय सदाचरण हा भक्तीचा पाया असून हरिनामाविना कलियुगात मुक्ती मिळू शकत नाही ! – भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे
भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे यांचे वैशिष्ट्य
‘आजवर माझे गुणवर्णन नाडीपट्टीच्या माध्यमातून आणि साधकांना मिळणारे ज्ञान यांतून केले गेले. हे गुणवर्णन करणारे सर्व सूक्ष्मस्तरावरील आहेत. प्रत्यक्ष देहधारी मनुष्यांमध्ये भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे हेही माझे अशाच प्रकारे गुणवर्णन करतात. ते एकमेवाद्वितीय आहेत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२३.५.२०२३)
१. भक्ती म्हणजे काय ?
१ अ. ‘ईश्वराला प्रिय असणारा आचार करणे, ही भक्ती आहे’, हे केवळ हिंदु धर्माने सांगितले आहे ! : ‘भक्ती नाही’, असा कोणता पंथ आहे ? हिंदु, इस्लाम, ख्रिस्ती, झोरोस्ट्रियन, ज्यू इत्यादी सर्व ईश्वरवादी आहेत. बौद्धपंथ निरीश्वरवादी आहे. निरीश्वरवादी पंथ असूनही त्यात भक्ती आहे. अन्य सर्व पंथ आणि वैदिक धर्म यांच्यात भक्तीच्या संदर्भातही मूलभूत भेद आहे. नामस्मरण, जप, पूजा, नमस्कार इत्यादी सगळ्या पंथांतच आहेत; पण ‘ईश्वराला प्रिय असणारा आचार करणे, ही भक्ती आहे’, हे मात्र केवळ हिंदु धर्माने गर्जना करून सांगितले आहे.
१ आ. जप, नामस्मरण आणि पूजा म्हणजे भक्ती नसून ती भक्तीची अंगे आहेत ! : याचा दुसरा अर्थ असा आहे की, देवाचे नावही न घेता भक्ती करता येते. नामस्मरण अवश्य करावे, जप अवश्य करावा; पण जप, नामस्मरण आणि पूजा म्हणजे भक्ती नसून ती भक्तीची अंगे आहेत.
१ इ. प्रेमाची उत्कटता म्हणजे भक्ती ! : प्रेमाची वासनामय वृद्धी प्रीतीत प्रगट होते, तर प्रेमाची वासनारहित वृद्धी भक्तीत परिणत होते.
१ ई. ईश्वराविषयी परम प्रेम म्हणजे भक्ती ! : अशी भक्ती एकदा का लागली, एकदा का तिची चटक लागली की, मनुष्य लौकिक कशाचीच इच्छा करत नाही, कशाबद्दल शोक करत नाही, कुणाचा द्वेष करत नाही, कसल्याही वैषयिक गोष्टीत रमत नाही किंबहुना ‘मी परमेश्वराचा सेवक आहे’, असा त्याचा भाव असतो.
१ उ. ‘माझे हे कर्म परमात्म्याला आवडेल का ?’, हा विचार करून त्याला आवडेल तेच कर्म करणे, म्हणजे भक्ती ! : मंत्र्याचा पट्टेवाला किती गुर्मीत असतो, तो मत्त बनतो. मी ‘मिनिस्टरचा अटेंडंट’ (मंत्र्यांचा सेवक) हीच मिजास ! असे किती मंत्री आले आणि गेले !
परमात्म्याचा मी दास ही मस्ती फार मोठी आहे; मात्र त्यामध्ये सनातन धर्माने फार तर्कशद्ध मार्ग सांगितला आहे. ‘लोके वेदेषु तदनुकूलाचरणम् ।’ (नारदभक्तिसूत्र, सूत्र ११), म्हणजे ‘लोक आणि वेद यांमध्ये जे भक्तीला अनुकूल असेल, असेच आचरण करणे.’ लौकिक आणि वैदिक कर्मे करतांना ‘माझे हे कर्म ‘त्या’ला (परमात्म्याला) आवडेल का ?’, हा विचार करून त्याला आवडेल तेच कर्म करणे, म्हणजे भक्ती.
‘लौकिक आणि वैदिक कर्मे करतांना ‘माझे हे कर्म ‘त्या’ला (परमात्म्याला) आवडेल का ?’, हा विचार करून त्याला आवडेल तेच कर्म करणे, म्हणजे भक्ती.’
१ ऊ. प्रत्येक क्षणी परमात्म्याशी अनुसंधान ठेवणे, हीच भक्ती ! : खातांना ‘हे मी खाणे योग्य आहे का ?’, इथपासून ते सर्व अर्थव्यवहार, लौकिक व्यवहार, नोकरीतील कामे करणे इत्यादी सर्व वेळी परमात्म्याशी अनुसंधान ठेवणे, हीच भक्ती ! कुणी विचारील, ‘देवाला काय आवडते, ते आपल्याला कसे कळावे ?’ ईश्वराने आपल्या हृदयात एक मीटर बसवला आहे. तो आपल्यालाच सूचना देत असतो. वाईट कर्म करतांना तो सारखे सांगत असतो, ‘हे करू नकोस, ते करू नकोस’; पण मनुष्य ती सूचना खुशाल दडपून करतो आणि मग पस्तावतो.
२. भक्तीचा पाया
२ अ. सदाचार हाच भक्तीचा पाया आहे ! : ‘सदाचार हाच भक्तीचा पाया’, यावर अन्य पंथांनी भर दिलेला नाही. ‘देव देव’ करणे म्हणजे भक्ती’, असे त्यात आहे. नारदाने म्हटले आहे,
‘हरेर्नामैव नामैव नामैव मम जीवनम् ।
कलौ नास्त्येव नास्त्येव नास्त्येव गतिरन्यथा ।।’;
– नारदपुराण, पूर्वखण्ड, पाद १, अध्याय ४१, श्लोक ११५
अर्थ : ‘भगवंताचे नाम हेच माझे जीवन आहे’, अशी अवस्था प्राप्त झाल्याविना कलियुगात मुक्ती मिळू शकत नाही.
कलियुगात हरिनामाविना गती नाही. मग त्याच नारदांना विचारले, ‘महाराज, कसेही आचरण करून स्वकर्तव्ये सोडून हरि हरि करणे बरोबर आहे का ? तेव्हा नारद म्हणतात,
अपहाय निजं कर्म कृष्ण कृष्णेति वादिनः ।
ते हरेर्द्वेषिणः पापाः धर्मार्थं जन्म यद् हरे ।।
अर्थ : स्वकर्म सोडून केवळ ‘कृष्ण कृष्ण’ म्हणणारे लोक भक्त नसून हरिद्रोही आहेत; कारण साक्षात् श्रीहरि स्वतः धर्मसंस्थापनेचे कर्म करण्यासाठी मृत्यूलोकात अवतरतात.
स्वतःचे कर्तव्यकर्म सोडून ‘कृष्ण कृष्ण’ करणारा परमेश्वराचा भक्त तर नाहीच; पण द्वेष्टा, पापी आणि ब्रह्मघातक्यासारखा पापी आहे.
२ आ. स्वकर्तव्य आणि ईश्वरप्रिय सदाचरण हाच भक्तीचा पाया आहे ! : स्वकर्तव्य आणि ईश्वरप्रिय सदाचरण हाच भक्तीचा पाया आहे. जो शुद्ध सदाचारी असून नामस्मरण करत नाही आणि जो नित्य जप करणारा सदाचाराने वागत नाही, त्यातील ‘देवाला कोण आवडेल ?’, याचे उत्तर हे तर्काला सहज कळणारे आहे.
केवळ सनातन धर्मानेच भक्तीचे हे स्वरूप आग्रहपूर्वक प्रतिपादिले आहे.’
– शेवडेंची अमेरिकेतील प्रवचने (हार्टफोर्ड, कनेक्टिकट,१८.९.१९८०)