मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांचे तात्काळ त्यागपत्र घ्यावे ! – अंजली दमानिया, सामाजिक कार्यकर्त्या
पुणे येथील पोर्शे कार अपघात प्रकरण !
मुंबई – पुण्यामधील पोर्शे कार अपघातप्रकरणी पुण्याच्या पोलीस आयुक्तांना पालकमंत्री अजित पवार यांचा दूरभाष आला होता का ? याविषयी त्यांनी तात्काळ स्पष्टीकरण द्यावे. अजित पवार यांनी पोलीस आयुक्तांना दूरभाष केला असेल, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांचे तात्काळ त्यागपत्र घ्यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. या मागणीचा व्हिडिओ त्यांनी ‘एक्स’ खात्यावरून प्रसारित केला आहे.
या व्हिडिओमध्ये अंजली दमानिया यांनी म्हटले आहे की, पुणे येथील भीषण अपघातामध्ये सर्व पोलीस यंत्रणा एका श्रीमंत कुटुंबासाठी काम करत होती. प्रत्येक गोष्टीत बोलणारे अजित पवार पुण्याचे पालकमंत्री असतांना या अपघाताविषयी एका शब्दानेही बोलले नाहीत. आमदार सुनील टिंगरे यांच्या सांगण्यावरून पोलीस आयुक्त काही करतील, असे वाटत नाही. पोलिसांची सारवासारव कुणासाठी चालली होती ? अजित पवार यांचा दूरभाष आला होता का ? याविषयी पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी तात्काळ स्पष्टीकरण द्यावे.