अग्रवाल कुटुंबाने ८४ लाख रुपये थकवल्याने मुलाने आत्महत्या केल्याचा कातोरे यांचा आरोप !
पुणे येथील अपघात प्रकरणातील अग्रवाल कुटुंबाच्या विरोधात आणखी एक तक्रार !
पुणे – येथील ‘हिट अँड रन’ प्रकरणातील अग्रवाल कुटुंबाच्या विरोधात आता आणखी एक तक्रारदार समोर आले आहेत. दत्तात्रेय कातोरे असे त्यांचे नाव असून ते अग्रवाल कुटुंबाच्या विरोधात पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रार प्रविष्ट करणार आहेत. अग्रवाल कुटुंबाने ८४ लाख रुपये थकवल्याने मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप कातोरे यांनी केला आहे. कातोरे हे अग्रवाल यांच्या ‘ब्रह्मा बिल्डर्स कंपनी’त काम करत होते. अग्रवाल कुटुंबाच्या विरोधात काही तक्रार असेल, तर ते सांगण्याचे आवाहन पोलिसांनी लोकांना केले होते. त्यानुसार आता तक्रारी समोर येत आहेत.
काय आहे प्रकरण ?
वर्ष २००० ते २००५ या कालावधीत कातोरे हे ‘ब्रह्मा बिल्डर्स कंपनी’कडे खोदाईचे काम करत होते. या कामाचे अग्रवाल कुटुंबाकडे ८४ लाख ५० सहस्र रुपये शेष होते. ‘त्यातील ७६ लाख ५० सहस्र रुपये मिळतील’, असे सांगण्यात आले होते. त्यातील ८ लाख रुपये मागण्यासाठी माझा मुलगा त्यांच्या रेसिडन्सी क्लबला कार्यालयामध्ये गेला होता; मात्र माझ्या मुलाला पैसे मिळाले नाहीत, उलट त्याला हाकलून लावण्यात आले. त्यामुळे माझ्या मुलाने तणावात स्वतःचे आयुष्य संपवले, असा आरोप दत्तात्रेय कातोरे यांनी केला आहे. तसेच उर्वरित पैसे आम्हाला मिळाले पाहिजेत, अशी मागणी कातोरे यांनी पोलिसांकडे केली आहे. |