संपादकीय : हिंदु संस्कृतीचे शिक्षण !
नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापिठाच्या वतीने आता विद्यार्थ्यांना हिंदु संस्कृतीचे शिक्षण मिळणार आहे. विद्यापिठाने २ दिवसांपूर्वीच हे घोषित करून हिंदु धर्माचे ज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी चांगला प्रारंभ केला आहे. ‘हिंदु धर्म संस्कृती मंदिर’ या संस्थेच्या समवेत सामंजस्य करार करण्यात आला आहे. या संस्थेकडे ७० सहस्रांहून अधिक प्राचीन ग्रंथांचा संग्रह आहे. या ग्रंथालयातून हिंदु धर्म परंपरा, धर्माविषयीचे प्राचीन ज्ञान विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे. ‘नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’मध्ये ‘भारतीय ज्ञान परंपरा’ या सूत्राचा समावेश करण्यात आला आहे. यानुसार विद्यार्थ्यांना भारतीय ज्ञान परंपरेचा अभ्यास आणि या क्षेत्रात संशोधन करता येण्यासाठी चांगले माध्यम उपलब्ध करून दिले आहे.
भारतीय हिंदु समाज विशेषत: धर्माविषयी थोडेबहुत ज्ञान असलेला, धर्माचा अभिमान असलेला समाज अशा बातम्यांनी थोडाफार प्रफुल्लित होतो. अनादी, अनंत, व्यापक असा हिंदु धर्म आज काही संप्रदाय, आध्यात्मिक संघटना, मंदिरे आणि त्याविषयीचे ग्रंथ यांपुरता सीमित आहे कि काय ? असे वाटू लागते. हिंदु विद्यार्थी, पालक आणि सर्वसामान्य हिंदु धर्मीय यांच्यासाठी हिंदु धर्माविषयी नेमके शास्त्रीय, परिपूर्ण अन् सर्वसमावेशक ज्ञान कुठे मिळेल ? याची नेमकी माहिती नसते. संशोधकांना संशोधन करायचे झाल्यास प्रारंभ कुठून आणि कसा करावा ? याविषयी संभ्रम असतो. एखाद्या सांप्रदायिक मार्गाने गेल्यास त्यामध्ये त्या संप्रदायाच्या साधनामार्गाच्या पुरताच विषय मर्यादित असतो. अन्य साधनामार्ग, उपासना मार्ग यांची ओळख करून देण्यात येत नाही. एखाद्या संतांकडे गेल्यास, ते संत त्यांनी ज्यांची उपासना करून संतपद गाठले आहे, त्यांच्याच उपासनेची परंपरा पुढे नेतात. समाजात बहुतांश संत भोंदू असल्याने त्यांच्याकडे ज्ञानार्जनाची शक्यता उरत नाही. आधुनिक लेखकांनी लिहिलेले लेख, म्हणजे त्यांच्या बुद्धीला धर्मातील पटलेल्या एखाद्या विषयाचे बौद्धिक स्तरावर केलेले विवेचन असते. परिणामी वाचकाला साधना करण्यासाठी, तो मूळ विषय समजून घेण्यासाठी तेवढा लाभ न होता मानसिक समाधान मिळते. प्रवचनकार, कीर्तनकार त्यांचा अभ्यास, वाचन, अनुभव, शिकवण यांनुसार एखादा विषय सांगतात. परिणामी हिंदु धर्माविषयी जाणून घेण्याची जिज्ञासा असणार्याला त्याची स्थिती, बौद्धिक क्षमता यांनुसार नेमके काय समजून घ्यायचे ? कुणाकडून मार्गदर्शन घ्यायचे, असे प्रश्न पडतात; पण ज्ञानतृष्णा पूर्ण होत नाही.
भारतीय ज्ञान
हिंदु धर्म प्राचीन आणि विश्वाच्या उगमापासूनच आहे. पृथ्वीची आणि जीवसृष्टीची उत्पत्ती होऊन काही लाख वर्षे झालेली आहेत, असे वैज्ञानिक सांगतात. सध्या जे काही शोध लागले आहेत, ज्यामध्ये शून्य, अणू, गुरुत्वाकर्षण, विविध क्षेपणास्त्रे, विमाने इत्यादींचे शोध आधुनिक विज्ञानाच्या पूर्वीच आपल्या ऋषिमुनींनी लावले आहेत. आज त्यासंबंधी काही शोध लागत आहेत.
विदेशातून शिक्षण घेऊन आलेले आणि भारतातच एखाद्या क्षेत्रात उच्च शिक्षण घेतलेले यांना भारतीय ऋषिमुनींनी लावलेले शोध, म्हणजे छद्म विज्ञान (खोटे विज्ञान) वाटते. त्यांच्या दृष्टीने भारतियांनी शोध लावले, असे काही नाही. आपल्याकडे काही ज्ञान हे गूढ शब्दांमध्ये आहे. काही ज्ञान सध्या उपलब्ध नाही. याची काही कारणेही आहेत. काही ज्ञान योग्य व्यक्तीच्या हातात पडावे, जेणेकरून तो त्याचा अपवापर करणार नाही, अशीही दैवी शक्तीची इच्छा असते. परिणामी त्या योग्यतेचा संशोधक, जिज्ञासू सापडला की, ते ज्ञान उपलब्ध होते.
गुरु-शिष्य परंपरा !
भारतीय संस्कृतीनुसार खरी ज्ञानार्जनाची पद्धत गुरु-शिष्य परंपरेने ज्ञान मिळवण्याचीच आहे. आपण एकाच जन्मात बुद्धीने अभ्यास करून, त्या त्या क्षेत्रातील तज्ञांकडून किती विषय शिकणार ? याला मर्यादा आहेत. प्रत्येक जण त्याच्या बौद्धिक क्षमता, आकलनक्षमता यांनुसार किती विषयांचे ज्ञान मिळवेल ? त्यात तज्ञ बनेल हे ठरेल. गुरु-शिष्य परंपरेत गुरूंनी सांगितलेली साधना करत शिष्य जेव्हा आध्यात्मिक प्रगती करू लागतो, तेव्हा त्याला तो शिकत असलेल्या विषयातील पुढचे पुढचे ज्ञान विश्वमन, विश्वबुद्धी यांतून मिळत जाते. जेव्हा शिष्य आध्यात्मिक उन्नतीचा मोठा टप्पा गाठतो, शिष्यावर गुरूंची पूर्ण कृपा होते, तेव्हा त्याला आतूनच ज्ञान मिळत जाते. हे ज्ञान विश्वमन, विश्वबुद्धी यांतून तो पाहिजे तेव्हा मिळवू शकतो. शिष्याला पाहिजे त्या विषयावर शिष्य ज्ञान मिळवू शकतो, हेच खरे ज्ञान आहे. शिष्याला स्वत:च्या आत्मस्वरूपाचे ज्ञान होतेच; मात्र बाह्य ज्ञानही लिलया होते. जगातील कोणत्याही प्रश्नाचे उत्तर, गुढातील गूढ गोष्टीची उकल करण्याचे सामर्थ्य त्याने मिळवलेले असते. हीच खरी आपली ज्ञानपरंपरा आहे. आपल्याकडे वेद, वेदांगे, उपनिषदे, दार्शनिके, पुराणे, श्रीमद्भागवत, रामायण, महाभारत असे अनेक प्राचीन धर्मग्रंथ आहेत. वेदांचा काळ हा सर्वांत प्राचीन, म्हणजे ज्या वेळी सृष्टी निर्माण झाली, त्या सृष्टीच्या चलन-वलनाचे नियम म्हणजे वेद आहेत. आतापर्यंत किती प्रगल्भ राष्ट्रपुरुष, धर्मपुरुष होऊन गेले. अनेक राज्यव्यवस्था उदयास आल्या. अनेक अद्भुत आश्चर्यकारक बांधकामे, त्यातही मंदिरांची बांधकामे उभारण्यात आली. अशी जर स्थिती आहे, तर किती विविध प्रकारचे ज्ञान, विज्ञान आपल्याकडे उपलब्ध असेल ? याची कल्पनाही करता येणार नाही. अगदी काही शतकांपूर्वी नालंदा, तक्षशिला अशी विद्यापिठे होती, ती धर्मांध आक्रमकांनी जाळली. तेथील ग्रंथालय कित्येक मास जळत होते. त्यावरूनही विपुल ज्ञानसंग्रहाची कल्पना येते. हे सर्व ज्ञान काळाच्या उदरात गडप झाले, असे वाटत असले, तरी ते ज्ञानाने मिळवण्याची दैवी व्यवस्थाही आपल्याकडे कार्यरत आहे.
हिंदु संस्कृतीचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्याला साधना समजण्याची आणि ती दैनंदिन जीवनात आचरणात आणण्यासाठीची व्यवस्था उभारण्यात विद्यापिठांनी पुढाकार घ्यायला हवा. भारतीय संस्कृतीतील ज्ञानाचा विचार केल्यास त्याला ‘अफाट’ आणि ‘अगाध’ हे दोन शब्द लागू पडतात. त्यामुळे नेमके काय वाचावे ? कुठून प्रारंभ करावा, याचे दिशानिर्देशन विद्यार्थ्याला होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याला एकदा ज्ञान मिळाले, त्याने थोडेबहुत त्याप्रमाणे आचरण केले, तरी त्याला दैवी अनुभूती मिळण्यास प्रारंभ होतो. त्याच्या स्वत:च्या व्यक्तीमत्त्वात, आचरणात आमूलाग्र पालट होण्यास प्रारंभ होतो, नीतीमत्तेत वाढ होऊ लागते. त्याच्या वाईट सवयी दूर होऊ लागतात. असे एक ना अनेक लाभ विद्यार्थ्याला होऊ शकतात. हिंदु संस्कृतीचे शिक्षण देण्याचा स्तुत्य उपक्रम एका विद्यापिठाने चालू केला आहे. आता सरकारने हे मनावर घेऊन पुरो(अधो)गाम्यांच्या कोणत्याही विरोधाला भीक न घालता राष्ट्रीय स्तरावर सर्वच विद्यापिठांमध्ये तो चालू करण्यासाठी प्रयत्न करावेत, ही अपेक्षा !
हिंदु संस्कृतीचे शिक्षण मिळण्याची व्यवस्था भारतातील सर्वच विद्यापिठांमध्ये होण्यासाठी सरकारी स्तरावर प्रयत्न हवेत ! |