कोल्हापूर शहरात अनेक ठिकाणी कचरा उचलला जात नाही !
‘समाजमन’ संस्थेच्या पहाणीत वास्तव उघड
कोल्हापूर – कोल्हापूर शहरात ‘समाजमन’ या स्वयंसेवी संस्थेने २५ मे या दिवशी ठिकठिकाणी महापालिका प्रशासन कचरा उठाव योग्य प्रकारे करते का ? याची पहाणी केली. यात उद्यमनगर, सोमवार पेठ, शनिवार पेठ, बुधवार पेठ, लक्ष्मीपुरी, फुलेवाडी नाका यांसह अनेक ठिकाणी कचरा उचलला नसल्याचे समोर आले. अनेक ठिकाणी कचरा कोंडाळे नसणे, कचरा रस्त्यावर उघड्यावरच टाकलेला असणे यांसह अनेक त्रुटी आढळून आल्या. शहरात अनेक ठिकाणी कचरा उठाव योग्य प्रकारे न झाल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते, असे ‘समाजमन’चे अध्यक्ष महेश गावडे यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलतांना सांगितले. (जी गोष्ट एका स्वयंसेवी संस्थेच्या लक्षात येते, ती सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या महापालिका प्रशासनाच्या का लक्षात येत नाही ? जनतेच्या कररूपी पैशातून गलेलठ्ठ वेतन घेणारे प्रशासकीय अधिकारी मग नेमके काम काय करतात ? – संपादक)
ते म्हणाले, ‘‘कोल्हापूर शहराचा विस्तार वाढत असल्याने लोकांच्या दैनंदिन गरजाही वाढत आहेत. काही ठिकाणी पायाभूत सुविधांची वानवाही जाणवत आहे. कोल्हापूर ही करवीर काशी, सांस्कृतिक, कलानगरी, उद्योगनगरी म्हणून प्रसिद्ध आहे; मात्र अलीकडे कचरा निर्मिती आणि उठावाच्या समस्येने उग्र रूप धारण केले. उपनगरांमध्ये कचरा कोंडाळे नसल्याने नागरिक कचरा कुठेही टाकतात. तरी याकडे याकडे प्रशासकांनी लक्ष घालावे.’’