सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा आत्यंतिक साधेपणा !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेमुळे आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ करून १५.५.२०२४ पर्यंत १२७ साधक संत झाले, तर १ सहस्र ५८ साधकांची संतत्वाच्या दिशेने वाटचाल चालू आहे. वर्ष २०१७ मध्ये मी एकदा सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना सुचवले होते, ‘‘आपल्या कृपेमुळे अनेक साधक ‘संत’ बनले. हळूहळू ते ‘सद्गुरु’ बनत आहेत आणि पुढे ‘परात्पर गुरु’सुद्धा बनतील. सध्या आपल्याही नावाच्या आधी आम्ही ‘परात्पर गुरु’ हीच उपाधी लावत आहोत; मात्र आपले स्थान सर्वांहून वेगळे आहे आणि ते वेगळेच असले अन् दिसलेही पाहिजे. आपल्या नावाच्या आधी आपण सर्वांपेक्षा वेगळी अशी उपाधी लावूया का ?’ यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर म्हणाले, ‘‘सध्या याचा विचार करायला नको.’’
वर्ष २०२२ मध्ये जीवनाडीपट्टीवाचनाच्या माध्यमातून महर्षींनी परात्पर गुरु डॉक्टरांना ‘सच्चिदानंद परब्रह्म’ ही उपाधी लावण्यास सांगितले. हे कळल्यावर मला पुष्कळ आनंद झाला. ‘माझी प्रार्थना देवाने ऐकली’, असे मला वाटले. त्यानंतर परात्पर गुरु डॉक्टर तशी उपाधी लावू लागले. काही मासांनी पुन्हा त्यांनी पूर्वीप्रमाणेच ‘परात्पर गुरु’ अशी उपाधी लावायला आरंभ केला. तेव्हा आम्ही त्यांना सांगितले, ‘‘महर्षींनी ‘सच्चिदानंद परब्रह्म’ ही उपाधी लावण्यास सांगितले आहे. त्यानुसार करणे योग्य ठरेल.’’ त्यानंतर त्यांनी पुन्हा ही नवीन उपाधी लावण्यास चालू केले.
या प्रसंगावरून मला सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचा आत्यंतिक साधेपणा लक्षात आला. ‘आपण इतरांपेक्षा निराळे किंवा श्रेष्ठ आहोत’, ही भावनाच त्यांच्यात नाही ! आज विविध सेवांचे दायित्व सांभाळणार्या काही साधकांमध्ये स्वतःची निराळी प्रतिमा जपण्याची भावना असते आणि ‘इतर साधकांनी माझे ऐकावे, मला मान द्यावा’, असेही त्यांना वाटत असते. अशा साधकांना सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचे हे उदाहरण निश्चितच अंतर्मुख करायला लावील.’
– (पू.) संदीप आळशी