शिष्यवृत्ती देण्याचे आमिष दाखवून ७ विद्यार्थिनींवर बलात्कार ; ४ कामगारांना अटक !
अॅपद्वारे महिलाधिकार्याच्या आवाजात बोलून विद्यार्थिंनींना बोलवले जात होते निर्जनस्थळी !
भोपाळ (मध्यप्रदेश) – राज्यातील सीधी जिल्ह्यात घडलेल्या एका घटनेत आवाज पालटणार्या एका ‘अॅप’चा वापर करून काही कामगारांनी शासकीय महाविद्यालयात शिकणार्या विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देण्याचे आमिष दाखवले, तसेच नंतर त्यांच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी ब्रिजेश प्रजापती, राहुल प्रजापती, लवकुश प्रजापती आणि संदीप प्रजापती या ४ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
ब्रिजेशने यूट्यूबवरून आवाज पालटण्याच्या अॅपविषयी माहिती मिळवली. त्या माध्यमातून तो महाविद्यालयातील विद्यार्थिनींना जाळ्यात ओढत होता. आवाज पालटण्याच्या अॅपचा वापर करून जिल्ह्यातील ‘संजय गांधी महाविद्यालया’च्या उच्चपदस्थ महिलाधिकारी रंजना यांच्या आवाजात विद्यार्थिनींना संपर्क साधला जायचा. विद्यार्थिनींचा विश्वास संपादन केल्यानंतर त्यांना शिष्यवृत्तीचे आमिष दाखवून कागदपत्रे घेण्याच्या बहाण्याने त्यांना विशिष्ट ठिकाणी बोलावले जायचे. विद्यार्थिनी तेथे आल्यावर त्यांना दुचाकीवर बसवून निर्जनस्थळी नेऊन त्यांच्यावर बलात्कार केले गेले.
या प्रकरणाविषयी मझोली पोलीस ठाण्यात एका महिलेचा निनावी दूरभाष आला. मिळालेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी सापळा रचून चौघांना अटक केली. चौकशीत त्यांनी ७ विद्यार्थिनींवर बलात्कार केल्याची स्वीकृती दिली. आता या प्रकरणात पीडित विद्यार्थिनी पुढे येऊन माहिती देत आहेत.