‘राजस्थानी मल्टिस्टेट’चे अध्यक्ष बियाणी यांच्यासह १७ जणांवर गुन्हा नोंद !
परळी येथील ७.५३ कोटी रुपयांचे फसवणूक प्रकरण
परळी – शहरातील ‘राजस्थानी मल्टिस्टेट’ पतसंस्थेतील ठेवीदारांची ७ कोटी ५३ लाख २९ सहस्र ९६८ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पतसंस्थेचे अध्यक्ष चंदूलाल बियाणीसह १७ संचालक, अधिकारी आणि कर्मचारी यांच्या विरोधात परळी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या मल्टिस्टेटच्या सर्व शाखा बंद आहेत. अध्यक्षांसह अनेक संचालक बेपत्ता असल्याने ठेवीदार आक्रमक झाले आहेत. २५० कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या या मल्टिस्टेटमध्ये गुंतवलेले पैसे मिळत नसल्याने ठेवीदारांनी २ दिवसांपूर्वी आंदोलन केले होते. दीर्घ प्रतीक्षेनंतर परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला; मात्र प्रत्यक्षात पोलीस अटकेची कारवाई करतात का ? याकडे ठेवीदारांचे लक्ष लागले आहे.