पुणे येथील शरद मोहोळ हत्या प्रकरणामध्ये २ सहस्र पानांचे आरोपपत्र प्रविष्ट !
१६ आरोपींना अटक; ‘मकोका’नुसार कारवाई
पुणे – कोथरूड येथील शरद मोहोळ हत्या प्रकरणामध्ये गुन्हे शाखेने २३ मे या दिवशी विशेष न्यायाधीश व्ही.आर्. कचरे यांच्या न्यायालयामध्ये १६ आरोपींच्या विरोधात २ सहस्र पानांचे आरोपपत्र प्रविष्ट केले. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार गणेश मारणे, विठ्ठल शेलार यांच्यासह इतर आरोपी सध्या येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. सर्व आरोपींवर ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्या’नुसार (मकोका) कारवाई करण्यात आली आहे. शरद मोहोळ यांची हत्या कोथरूड भागातील सुतारदरा येथे ५ जानेवारी या दिवशी झाली होती.
घटनेनंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुणे-सातारा रस्त्यावरील शिरवळजवळ ८ आरोपींना अटक केली होती. त्यांच्याकडून ३ पिस्तुलांसह ३ मॅगझीन, ५ काडतुसे आणि २ चारचाकी कह्यात घेतल्या होत्या. भूमीच्या आणि आर्थिक वादातून हत्या केल्याचे अन्वेषणातून समोर आले आहे.