नागपूर येथे मद्यधुंद वाहनचालकाची लहान बाळ आणि महिलेसह एकाला धडक !
|
नागपूर – येथील झेंडा चौक येथे २४ मेच्या रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने आलेल्या मद्यधुंद वाहनचालकाने ३ जणांना धडक दिली. यामध्ये ३ महिन्यांच्या बाळासह एक महिला आणि एक इसम यांचा समावेश आहे. बाळ आणि महिला गंभीर घायाळ असून बाळाची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी पोलिसांनी सन्नी चव्हाण, अंशुल ढाले आणि आकाश निमोरिया या तिघांना अटक केली आहे. वाहनचालक आणि त्याच्यासमवेत गाडीत बसलेले त्याचे २ सहकारी मद्यधुंद अवस्थेत होते.
जमावाकडून वाहनाची तोडफोड !
वाहनामधील एकाला जमावाने पकडून पोलिसांच्या कह्यात दिले असून इतर दोघे प्रथम पसार झाले होते. संतप्त जमावाने वाहनाची तोडफोड केली. पोलिसांनी घायाळ झालेल्यांना मेयो रुग्णालयात भरती केले आणि अन्य दोघांना कह्यात घेतले. तिघांवरही गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
गाडीत मद्य आणि गांजा सापडला !
गाडीमधील तरुणांनी मद्य आणि गांजा यांचे सेवन केले होते. पोलिसांनी आरोपींकडून ३२ ग्रॅम अमली पदार्थ जप्त केले आहेत. गाडीत विदेशी मद्याच्या २ बाटल्याही सापडल्या आहेत.
संपादकीय भूमिका : मद्यधुंद वाहनचालकांना कठोर शिक्षा केल्याविना असे प्रकार थांबणार नाहीत ! |