संपादकीय : ‘त्वां शिरसा नमामि । त्वां शरणं प्रपद्ये ।’
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले या अवतारी विभूतीने वर्ष १९४२ मध्ये वैशाख कृष्ण सप्तमीला या पृथ्वीतलावर जन्म घेतला. प्रसिद्ध जीवनाडीपट्टीवाचक पू. (डॉ.) ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून साक्षात् महर्षींनी ते अवतार असल्याचे वर्ष २०१५ मध्ये घोषित केले. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मानसोपचारतज्ञ असूनही त्यांच्या साधनेच्या आरंभीच्या काळात त्यांनी अनेक संतांकडे जाऊन अध्यात्माचा अभ्यास केला आणि कलियुगातील मानवाच्या जलद आध्यात्मिक उन्नतीसाठी ‘गुरुकृपायोगा’ची निर्मिती केली. त्यांचे स्थूलातील धर्मप्रसार, ग्रंथलिखाण, आश्रमनिर्मिती, अध्यात्म, कला आदींच्या संदर्भातील संशोधन, हिंदूजागृती आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठीचे लौकिक कार्यच एवढे अलौकिक आहे की, त्यावरून त्यांच्या ईश्वरी अवताराची प्रचीती येतेच; परंतु त्याहीपेक्षा त्यांचे सूक्ष्मातील कार्य त्यांच्यातील देवत्वाची प्रचीती देणारे आणि एवढे उच्च कोटीचे आहे की, खरेतर ते आम्हा पामरांच्या आकलनक्षमतेच्या पलीकडचे आहे; तरीही स्तुतीगानाच्या माध्यमातून भक्तीसमर्पणासाठी कृतज्ञताभावाने आणि शरण जाऊन येथे काही अल्पस्वल्प मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
ज्ञानशक्तीचे अद्वितीय कार्य !
‘अतिशय मोजक्या आणि अत्यंत सोप्या शब्दांत प्रश्नाचे मूलभूत उत्तर देणे’, हे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे वैशिष्ट्य आहे. ईश्वर, अवतार, देव, ऋषिमुनी, गुरु, संत, धर्मगुरु आदींमधला भेद; ईश्वर(आनंद)प्राप्तीच्या विविध साधनामार्गांतील भेद; सामान्य माणूस ते ईश्वर यांची आध्यात्मिक पातळी, त्याची वैशिष्ट्ये आदी अध्यात्मज्ञानातील असंख्य बारकावे त्यांनी प्रथमच शास्त्रशुद्धरित्या; पण सोप्या शब्दांत मांडले. अनंतकोटी अध्यात्मज्ञानाचे सार आणि मूलभूत तत्त्वे नेमक्या शब्दांत मांडून त्यांनी कलियुगातील मानवाला अध्यात्मज्ञानाचे दालन खुले केले. सध्या धर्मग्रंथ समजणे कठीण असल्याने त्यांतील जीवनाच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करणारे ज्ञान १३ भाषांतील ३६५ प्रकाशित आणि ५ सहस्र अप्रकाशित ग्रंथांतून त्यांनी संकलन केले आहे. वैज्ञानिक परिभाषा आणि सूक्ष्मातून मिळालेले दैवी ज्ञान, ही त्यांच्या ग्रंथांची वैशिष्ट्ये आहेत.
साधनेची आणि दैवी गुणांची शिकवण !
‘सध्याच्या काळात साधनेच्या अंतिम टप्प्यापर्यंत जलद गतीने जाण्यासाठी काय केले पाहिजे ?’, हे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले गेली ४ दशके अविरतपणे समाजाला सांगत आहेत. भावभक्तीच्या व्यष्टी प्रयत्नांसह ‘ज्याला जे येते, ते सत्सेवाभावाने करत राहिल्यास ईश्वरप्राप्तीच्या दिशेने जाणे सुलभ होते’, हे शास्त्र सांगून त्यांनी साधकांकडून ते अनुसरून घेतले. बांधकाम, लागवड, सुतारकाम, शिवणकाम, स्वयंपाक, विविध कला अशा प्रत्येक क्षेत्राच्या माध्यमातून ईश्वरापर्यंत जाण्यासाठी काय केले पाहिजे ?, ‘प्रत्येक कृती परिपूर्ण आणि देवाला आवडेल अशी कशी करायची ?’, हे त्यांनी शिकवले. ‘देवाचे गुण आपल्यात आले की, आपली देवत्वाकडे वाटचाल होते’, इतके साधे सोपे गणित त्यांनी मांडले आणि त्यांच्यातील प्रीती, परिपूर्णता, काटकसरीपणा, नम्रता, आज्ञाधारकता, शिष्यभाव आदी ईश्वरी गुणांचा खजिना त्यांनी विश्वाला शिकण्यासाठी खुला केला. अंतःकरणशुद्धी, षड्रिपूनिर्मूलन याविषयी यापूर्वी काही संतांनी सांगितले आहे; परंतु मन आणि कृती यांच्या स्तरावर दोष अन् अहं यांचे निर्मूलन कसे करायचे ? याची शास्त्रशुद्ध प्रक्रिया त्यांनी शोधून काढली आणि देवाकडे गतीने जाण्याचे प्रवेशद्वार त्यांनी उघडून दिले. गुरुकृपायोगानुसार साधना करून आज ‘१२७ जणांनी संतपद गाठणे आणि १ सहस्र ५० हून अधिक साधक संत बनण्याच्या मार्गावर असणे’, हे त्यांनी सांगितलेल्या साधनेचे वैशिष्ट्य आहे. ‘आपल्यासारखे करिती तात्काळ ।’ या जगद्गुरु तुकारामांनी वर्णिलेल्या सद्गुरूंच्या वैशिष्ट्याप्रमाणे हे आहे.
अवतारी संशोधक !
जीवनाचे अध्यात्मीकरण करण्याचे ध्येय देऊन त्या माध्यमातून समाज आणि राष्ट्र यांची उन्नती करण्याचा संकल्पच जणू सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केला आहे. अध्यात्म हे मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजेच स्पंदनांचे, अनुभूतींचे आणि चैतन्याचे सूक्ष्म शास्त्र असल्याचे त्यांनी उलगडून सांगितल्याने सामान्यांना ते एका टप्प्यापर्यंत समजून घेणे शक्य झाले आहे. आहार, वेशभूषा, केशभूषा, दागिने, कपडे, वास्तू, वस्तू, रंग, अक्षरे आदी जीवनाच्या प्रत्येक गोष्टीतील सात्त्विक आणि असात्त्विक भेद सांगून त्याची कारणे त्यांनी सांगितली. सप्त लोक आणि पाताळ, वाईट शक्तींचे प्रकार; शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रासांचे वर्गीकरण अन् त्यावरील उपाय; साधनेतील सूक्ष्मातील अडथळे आणि त्यावरील उपाय; पंचमहाभूते अन् त्यांचा मानवी शरिराशी संबंध आदी अनेक गोष्टींवरील विविधांगी संशोधन त्यांनी केले. हे संशोधन आंतरराष्ट्रीय परिषदांत सादर केले जात आहे. त्यांच्या प्रेरणेने उभे रहात असलेले महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय येत्या काळात ‘सर्व विषयांच्या माध्यमातून ईश्वरप्राप्ती कशी करायची ?’, हे शिकवणारे विश्वकेंद्र बनणार आहे. कलियुगात सर्वाेच्च देवतातत्त्व प्रक्षेपित करणारी देवतांची चित्रे आणि मूर्ती यांची निर्मिती ही त्यांच्याकडून मानवाला मिळालेली सर्वांत महान देणगी आहे.
धर्मनिष्ठ राष्ट्रव्यवस्थेचे ध्येय देऊन ते शिकवणारे अवतारत्व !
‘धर्मांतर, लव्ह जिहाद आदी आक्रमणांना हिंदू फसण्याचे मूळ कारण धर्मशिक्षण आणि धर्माचरणाचा अभाव हे आहे’; राष्ट्रापुढील सर्वच समस्यांवर ‘हिंदु राष्ट्र’ हेच उत्तर आहे’, हे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सर्वप्रथम सांगितले. हिंदुत्वनिष्ठांना दिशादर्शन करणारे ते धर्मगुरु होत. ‘राजकीय नव्हे, तर आध्यात्मिक स्तरावरील हिंदु राष्ट्राची स्थापना’, हे साधना करणार्या जिवांसाठी त्यांनी समष्टी साधनेचे ध्येय दिले. हिंदु राष्ट्राचे उद्गातेच नव्हे, तर बीजरूपाने ही संकल्पना रुजवून पुढे हिंदु राष्ट्र चालवण्याची व्यवस्था होण्यासाठीही प्रयत्नरत असणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे एकमेव होत ! ‘आदर्श राष्ट्राचे व्यवस्थापन कसे असावे ?’, याचे धडे गुरुकुलासम त्यांनी निर्मिलेल्या आश्रमात ते गिरवून घेत आहेत. प्रत्येक १ सहस्र वर्षांनी ईश्वराच्या अंशात्मक अवताराचा जन्म होण्याचे शास्त्र, प्राचीन काळी लिहिलेल्या ‘विष्णुसहस्रनामा’त ‘जयंत’ हे नाव असणे, महर्षींनी सातत्याने त्यांच्या अवतारत्वाचा केलेला जागर, त्यांच्या शरिरात झालेले दैवी पालट, अशा अनेक गोष्टी त्यांचे अवतारत्व सिद्ध करतात. अशा जीवनोद्धारक, धर्मसंस्थापक, मोक्षगुरु आणि जगद्गुरु सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संकल्प करुन त्यासाठी सर्वांना कृतीप्रवण करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले हे एकमेव होत ! |
|