सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे वैद्यकीय क्षेत्रातील आणि संमोहन-उपचार क्षेत्रातील संशोधनकार्य !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कार्याला सीमा नाही. जसे ज्ञानाच्या संदर्भात ‘व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम् ।’, म्हणजे ‘जगातील सर्व ज्ञान व्यासांनी चाखलेले आहे’, असे म्हणतात, त्याचप्रमाणे विश्वकल्याणासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी सर्वच क्षेत्रांत कार्य केलेले आहे, असे म्हणावे लागेल. त्यांच्या या ब्रह्मांडव्यापी कार्यातील काही कार्याची ज्याची पूर्वी कधी फारशी प्रसिद्धी झाली नाही, त्याची या विशेषांकात अल्पशी ओळख करून देण्याचा प्रयत्न करत आहे. यापैकी त्यांचे वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनकार्य यांची ओळख या लेखातून करून घेऊया.
१. वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनकार्य
मुंबईतील विविध रुग्णालयांत ५ वर्षे नोकरी केल्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वर्ष १९७१ ते वर्ष १९७८ या कालावधीत ब्रिटनमध्ये नोकरीनिमित्त वास्तव्य केले. या काळात त्यांनी पुढील संशोधनकार्य केले.
अ. मनोविकारांवरील संमोहन-उपचारपद्धतींवर संशोधन केले.
आ. वापरून टाकून देण्यायोग्य (Use & Throw) कान तपासण्यासाठीचे प्लास्टिकचे उपकरण (डिस्पोझेबल ऑरल स्पेक्युलम्) वैद्यकीय शास्त्रात प्रथमच बनवले. याला ब्रिटनसह अन्य देशांतून पुष्कळ मागणी होती. त्या वेळी अनेक कान-नाक-घसा तज्ञांनीही या शोधकार्याची प्रशंसा केली.
इ. वापरून टाकून देण्यायोग्य नाक तपासण्यासाठीचे प्लास्टिकचे उपकरण (डिस्पोझेबल नेझल स्पेक्युलम्), फायबर ग्लासचे गोळ्या मोजायचे यंत्र (टॅबलेट काउंटिंग मशीन), तसेच ‘स्टेथोस्कोप’चे (टीप) एकदा वापरून टाकून देण्यायोग्य कानात घालायचे भाग (डिस्पोझेबल इअर पीस) बनवण्याचा विचार चालू असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे भारतात परतण्याचे ठरल्याने हे शोधकार्य अपुरे राहिले.
टीप – ‘स्टेथोस्कोप’ म्हणजे हृदयाची धडधड किंवा श्वासोच्छ्वास ऐकण्यासाठी वापरण्यात येणारे उपकरण
२. संमोहन-उपचार क्षेत्रातील संशोधनकार्य आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संमोहन-उपचारतज्ञ
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ब्रिटनमध्ये संमोहन-उपचारपद्धतीवर यशस्वी संशोधन केल्यानंतर त्यांची ‘संमोहन उपचारतज्ञ’ म्हणून आंतरराष्ट्रीय कीर्ती झाली. वर्ष १९७८ मध्ये मुंबईला परतल्यावर त्यांनी मुंबईत मनोविकारांवरील संमोहन-उपचारतज्ञ म्हणून स्वतंत्र व्यवसाय चालू केला, तसेच अनेक आधुनिक वैद्यांना (डॉक्टरांना) संमोहनशास्त्र आणि संमोहन-उपचार यांचे सिद्धांत अन् प्रात्यक्षिके यांविषयी अमूल्य मार्गदर्शन केले.
२ अ. संमोहन उपचारातील स्वयंसूचनांच्या नाविन्यपूर्ण पद्धती शोधणे
ब्रिटनमध्ये मनोविकारांच्या रुग्णांवर उपचार करतांना परात्पर गुरु डॉक्टरांच्या लक्षात आले की, मनोविकार मूलभूतपणे स्वभावदोष आणि अहं यांच्यामुळे निर्माण होतात. स्वभावाला औषध नसल्यामुळे त्यांनी स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्याच्या उपचारपद्धती शोधल्या. त्यांच्या हेही लक्षात आले की, रुग्णांना उपचार करणार्यांकडे उपचार करून घेण्यासाठी वारंवार जावे लागते. त्यामुळे रुग्णांचा वेळ आणि पैसे वाया जातात, तसेच उपचारही प्रतिदिन होऊ शकत नाहीत. यांवर मात करण्यासाठी त्यांनी स्वयंसूचना उपचारपद्धत शोधली. त्या पद्धतीचा वापर करून रुग्ण स्वतःवर दिवसभरात १० – १५ वेळाही उपचार करू शकत असे. त्यामुळे तो लवकर बरा होत असे.
२ आ. मानसिक ताणामुळेही ‘इओसिनोफिलिया’ होत असल्याचे शोधणे
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘इओसिनोफिलिया’ हा रक्तातील पेशींचा एक विकार मानसिक ताणामुळेही होऊ शकतो’, याचा शोध लावला.
२ इ. ‘भारतीय वैद्यकीय संमोहन आणि संशोधन संस्थे’ची स्थापना आणि तिच्याद्वारे केलेले कार्य
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी १.१.१९८२ या दिवशी ‘भारतीय वैद्यकीय संमोहन आणि संशोधन संस्था (द इंडियन सोसायटी फॉर क्लिनिकल हिप्नॉसिस अँड रिसर्च)’ स्थापन केली. ‘आंतरराष्ट्रीय संमोहन संस्थे’शी संलग्न असलेल्या या संस्थेची ‘वैद्यकीय दृष्टीकोनातून संमोहनशास्त्राविषयी संशोधन करणे आणि भारतात संमोहन उपचार पद्धतीचा प्रसार करणे’, ही उद्दिष्टे होती. या संस्थेमध्ये ८ ते १० डॉक्टर्स संशोधनरत होते. या संस्थेद्वारे डॉक्टर, दंतवैद्य, मानसशास्त्रज्ञ (सायकॉलॉजिस्ट) आणि मानसोपचारतज्ञ यांच्यासाठी १९८२ ते १९८६ या कालावधीत मुंबई, बडोदा, कोलकाता आदी ठिकाणी संमोहन उपचारशास्त्राचे अभ्यासवर्ग आयोजित करून सुमारे ४०० तज्ञांना प्रशिक्षण देण्यात आले.
२ ई. संमोहनशास्त्र आणि संमोहन-उपचार यांवरील ग्रंथसंपदा !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी लिहिलेले ‘दी इंडियन जर्नल ऑफ क्लिनिकल हिप्नोसिस् ॲण्ड रिसर्च’चे १ ते ५ भाग (वर्ष १९८३ – वर्ष १९८७), ‘हिप्नोथेरपी ॲकॉर्डिंग टू दि पर्सनॅलिटी डिफेक्ट मॉडेल ऑफ सायकोथेरपी’, ‘संमोहनशास्त्र’, ‘सुखी जीवनासाठी संमोहन उपचार’, ‘शारीरिक विकारांवर स्वसंमोहन उपचार’, ‘लैंगिक समस्यांवर स्वसंमोहन उपचार’, ‘मनोविकारांवर स्वसंमोहन उपचार’ (२ भाग), ‘स्वभावदोष निर्मूलन आणि गुणसंवर्धन प्रक्रिया’ (३ भाग), हे ग्रंथ; लोकप्रिय नियतकालिकांतून प्रसिद्ध झालेले त्यांचे १२३ लेख आणि विदेशात कौतुक झालेले शोध-निबंध ही त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील यशस्वी कारकीर्दीची, तसेच संमोहन-उपचारांच्या संदर्भातील व्यासंगपूर्ण अन् अद्वितीय संशोधनाची फलनिष्पत्ती आहे.
(सर्व लिखाणासाठी संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘परात्पर गुरु डॉक्टरांचे अद्वितीय कार्य : खंड १’)
संशोधनाविषयी देश-विदेशातील तज्ञांच्या काही प्रतिक्रिया
‘भारतीय वैद्यकीय संमोहन आणि संशोधन संस्था’ या संस्थेच्या वतीने काढलेल्या नियतकालिकाचा पहिला अंक अमेरिका, कॅनडा, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया या देशांतील प्रमुख संमोहन उपचारतज्ञांना त्यांनी भेट म्हणून पाठवला होता. त्या अंकाचे जगातील बरेच मानसोपचारतज्ञ आणि संमोहन उपचारतज्ञ यांनी पुष्कळ कौतुक केले. त्यांपैकी काही अभिप्राय पुढीलप्रमाणे आहेत.
‘आपले नियतकालिक अतिशय उत्कृष्ट आहे. आपल्या अंकात संशोधनात्मक भरपूर माहिती आहे.’
– डॉ. जे. आर्थर जॅक्सन, कार्यकारी संपादक, ऑस्ट्रेलियन उपचार आणि प्रायोगिक संमोहन शास्त्राविषयीचे नियतकालिक (मॅनेजिंग एडिटर, ऑस्ट्रेलियन जर्नल ऑफ क्लिनिकल अँड एक्स्पेरिमेंटल हिप्नोसिस) (२४.५.१९८५)
‘आपल्या अंकात बरेच नवीन शास्त्रीय शब्द पहायला मिळाले. आपण शोधून काढलेली ‘अयोग्य गोष्टीची जाणीव आणि तीवर नियंत्रण’ ही उपचारपद्धत विशेष आवडली. आपल्या लिखाणातून अनुभवांवर आधारलेली आपली नवीन विचारसरणी दिसून येते. संशोधनपर एक सुंदर अंक पहाण्याची संधी दिली; म्हणून आपले अनेक आभार.’
– डॉ. स्त्रुअन जे.टी. रॉबर्टसन, पहिले अध्यक्ष, स्कॉटलँड शाखा, ब्रिटिश प्रायोगिक आणि उपचाराविषयीची संमोहन संस्था. (द इनॉगरल चेअरमन, स्कॉटिश ब्रांच, ब्रिटिश सोसायटी ऑफ एक्स्पेरिमेंटल ॲन्ड क्लिनिकल हिप्नोसिस) (९.६.१९८४)
‘हे पुस्तक सदरच्या विषयाची सांगोपांग माहिती देते आणि ती माहिती प्रत्यक्षात आणणे सोपे आहे. सदरच्या विषयाच्या प्रश्नाचा आणि कार्यप्रणालीचा लेखकांनी योग्य प्रकारे विचार केला आहे.’
– प्रा. कॅथरीन वेल्ड्स, अनुज्ञापित (व्यावसायिक परवाना असलेले), बोर्ड-प्रमाणित (शासन-मान्य संस्थाद्वारा प्रमाणित) मनोवैज्ञानिक, कॅलिफोर्निया.
‘संमोहनशास्त्रातील अनेक अनुभव या पुस्तकामध्ये सविस्तरपणे सांगण्यात आलेले असून संमोहनशास्त्राचा प्रत्यक्ष वापर करणार्यांना ते उपयोगाचे ठरतील.’
– प्रो. अर्नेस्ट हिलगार्ड, मानसशास्त्र प्राध्यापक एमेरीटस, स्टॅनफोर्ड विद्यापीठ, अमेरिका, तसेच आंतरराष्ट्रीय संमोहनशास्त्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष.
‘हे पुस्तक सदरच्या विषयाची मौल्यवान माहिती देते. वाचकाला त्या माहितीचा चांगला उपयोग होईल, असा मला विश्वास वाटतो.’
– डॉ. एल्. पी. शहा, मानसोपचारशास्त्राचे मानद प्राध्यापक, के. ई. एम्. रुग्णालय आणि जी. एस्. वैद्यक महाविद्यालय, मुंबई, तसेच इंडियन सायकिॲट्रिक सोसायटीचे मानद महासचिव