मुख्य सूत्रधार सतीश सोनवणे याला कारागृहातून घेतले कह्यात !
|
छत्रपती संभाजीनगर – अवैध गर्भलिंगनिदान आणि गर्भपात प्रकरणी आतापर्यंत ५ आधुनिक वैद्य पसार झाले असून या रॅकेटचा मुख्य सूत्रधार सतीश सोनवणे याला हर्सूल कारागृहातून पोलिसांनी कह्यात घेतले आहे. सोनवणे हा काळा धंदा चालवत आहे. सिल्लोड तालुक्यातील भराडी आणि आमठाणा येथील आधुनिक वैद्य सुनील राजपूत यांच्या पुंडलिकनगर येथील दवाखान्यात पोलीस गेले होते; मात्र पथक पोचण्यापूर्वीच आधुनिक वैद्य राजपूत तेथून गेले होते.
छत्रपती संभाजीनगर शहरात अवैध गर्भपात प्रकरणी कारवाई झाल्यानंतर सिल्लोड येथे विनाअनुमती चालू असलेल्या श्री रुग्णालयाचा भांडाफोड झाला. तेथील आधुनिक वैद्य रोशन ढाकरे याच्यासह त्याच्या ३ सहकार्यांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे. २४ मेपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या आरोपींकडून अनेकांची नावे उघड होत असल्याने त्या दिशेने पोलीस अन्वेषण करत आहेत. कारवाई टाळण्यासाठी अनेक आधुनिक वैद्य आपल्या दवाखान्यांना कुलूप ठोकून कुटुंबांसह पसार झाले आहेत.
गारखेडा येथील आरोपी साक्षी थोरात सतीश सोनवणे याला भेटण्यासाठी हर्सूल कारागृहात जात होती. सतीश याने तिला चायना मेड पोर्टेबल सोनोग्राफी यंत्र दिल्याचा जवाब दिला आहे. तिच्या घरी धाड घालणार्या पथकाने सतीश याने तिला कारागृहातून पाठवलेले पत्र जप्त केले. त्यामुळे या रॅकेटमध्ये छत्रपती संभाजीनगर शहरासह परिसरातील आणखी कुणा नामांकित आधुनिक वैद्य आणि पी.आर्.ओ. दलालांचा समावेश उघड होण्याची शक्यता आहे.