तुम्ही काय खात आहात ? याचा विचार करा !
देशातील पाश्चात्त्य वैद्यकाच्या शीर्षस्थ संशोधन संस्थेने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार भारतियांचे अनुमाने ५६ टक्के अनारोग्य हे त्यांच्या आहाराशी संबंधित आहे. हेच संशोधन आयुर्वेदानुसार झाले, तर ही टक्केवारी किमान २० टक्क्यांनी अधिक वाढेल !
अनेक वैद्य फेसबुकवर आहाराविषयी नियमितपणे लिहीत असतात. कित्येक जण त्यातील स्वतःशी संबंधित भाग समजावून घेऊन योग्य पालट करतात आणि हे सल्ले नीट पाळतात. याहून पुढे कित्येकांना इथले वैद्य नैतिकतेचा पाठ देत आहेत, असेही वाटत असते. लक्षात घ्या, तुमचा आहार नीट असला, तर तुम्ही निरोगी रहाण्याची शक्यता वाढेल. यात त्या वैद्यांची एक प्रकारे आर्थिक हानीच नाही का ? तरीही जेव्हा या काळजीने ते आपल्याला महत्त्वाचे सल्ले देत असतात, तेव्हा ते स्वीकारणे हे सूज्ञतेचे लक्षण आहे. विचार करून पहा !
१. भारतीय खाद्य उत्पादनांवर युरोपमध्ये बंदी; पण भारतात मात्र सर्रास विक्री !
हाच अहवाल असे सांगतो की, आपण बाहेरून घेत असलेल्या खाद्यपदार्थांची ‘लेबल्स’ (खाद्यपदार्थाला लावलेली नावाची चिठ्ठी) नीट वाचा. याचा अर्थ ‘लेबल’ नीट वाचा आणि मग बिनधास्त खरेदी करा’, असा सोयीस्कर अर्थ मात्र काढायचा नाही ! त्यातील सगळे घटक खरच नमूद केले आहेत का ? इथपासून नमूद केलेल्या घटकांचे गांभीर्य आपल्याला कळते आहे का ? असे सारे प्रश्न इथे उपस्थित होतात. पहिला प्रश्न याकरता उपस्थित होतो; कारण गेल्या ५ वर्षांत युरोपियन युनियनने अनुमाने ४०० भारतीय खाद्य उत्पादनांवर बंदी घातली आहे. ही उत्पादने भारतीय बाजारात विकली जात आहेतच. आता ‘या बंदीमागे फक्त व्यावसायिक वैर असेल’, असे म्हणायचे, तर मग त्यांचे उत्पादक शांत राहिले असते का ? म्हणजेच कुठे तरी पाणी मुरत आहे. बर बाहेरचे सोडा. आपल्याच देशातील स्वदेशी ब्रँडच्या (नामांकित) काही उत्पादनांत गुणवत्तेचे निकष पूर्ण नसल्याने २ दिवसांपूर्वी कारवाई करण्यात आली आहे. बातम्या नीट वाचल्यास हे कळेल !
२. सिद्ध (तयार) खाद्यपदार्थांचे दुष्परिणाम जाणून घरच्या घरीच पदार्थ बनवा !
तुम्ही सर्रास खात असलेली बिस्कीटे, चीज, बटर ते अगदी प्रतिदिन वापरत असलेली ‘रेडिमेड’ (सिद्ध) आले-लसूण पेस्ट यांतून किती रसायने पोटात ढकलत आहात, हे जरा मोजून पहाता ? या सगळ्याचे दीर्घकालीन दुष्परिणाम जरा वेळ जाणून घेता का ? नाही. येथेही नेहमीप्रमाणेच वेळेत जाणीव करून देण्याचा उद्देश आहे. आपल्यासमोर एक विशिष्ट टक्का या खर्या समस्या कधीच आणणार नाही. आयुर्वेदाविषयी मात्र न चुकता खोटे काही तरी बोलत रहातील. यातील नेमके काय घ्यायचे, ते तुम्हीच ठरवा !
त्यामुळे अधिकाधिक घरी बनवलेले आणि ताजे पदार्थ खा. मसाल्यांपासून ‘आले लसूण पेस्टपर्यंत जे जे घरी सिद्ध करता येते, ते करा. शक्य तितके पाकीटबंद अन्न टाळा आणि आम्ही वैद्य वेळोवेळी आरोग्याच्या काळजीने जे ऋतूनुसार किंवा अन्यथा आहाराविषयी जे काही लिहितो ते पाळा. लक्षात घ्या, ही माहिती देण्यामागे आपण कुणाचे तरी भले करू शकलो, यातच आम्हाला पुरेपूर समाधान असते.
– वैद्य परिक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली. (२१.५.२०२४)