साधकाकडे सुटे पैसे नसल्याने फलाट तिकीट मिळण्यास अडचण येणे; पण ऐन वेळी एका अनोळखी व्यक्तीने तिकीट काढून साहाय्य करणे
‘१५.१०.२०२३ या दिवशी मी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांना आणण्यासाठी देहली रेल्वे स्थानकावर गेलो होतो. तिथे फलाट तिकीट काढण्यासाठी मी १०० रुपयांची नोट दिली. तेव्हा तिकीट देणार्या व्यक्तीने मला सुटे १० रुपये देण्यास सांगितले. मी आजूबाजूला जाऊन सुटे पैसे मिळवण्याचा प्रयत्न केला; पण मला सुटे पैसे मिळाले नाहीत. तेवढ्यात सद्गुरु पिंगळेकाका ज्या रेल्वेगाडीने येत होते, ती गाडी फलाटावर येत आहे’, अशी २ – ३ वेळा उद्घोषणा झाली. त्या वेळी मी तिकीट देणार्या व्यक्तीला ‘तुम्ही आता १०० रुपये ठेवून घ्या आणि बाकीचे पैसे मला नंतर द्या’, असे सांगून तिकीट देण्याची विनंती केली, तरीही त्याने तिकीट दिले नाही. माझ्या मनात ‘आता सद्गुरु काकांना त्यांचे साहित्य घेऊन खाली उतरावे लागेल’, असा विचार आला. त्यामुळे मी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीकृष्ण यांच्या चरणी ‘मला क्षमा करा आणि साहाय्य करा !’, अशी प्रार्थना करत होतो. एवढ्यात एक व्यक्ती तिथे आली आणि तिने २० रुपये देऊन स्वतःसाठी आणि माझ्यासाठी फलाट तिकीट काढले. तिकिटाचे पैसे परत करण्यासाठी मी त्या व्यक्तीला तिचे नाव आणि भ्रमणभाष क्रमांक विचारला. त्या वेळी ती व्यक्ती मला म्हणाली, ‘‘पंडितजी, कभी कभी हमे भी धर्मकार्य करनेका, सेवा करनेका मौका मिलना चाहिए ना !’’ आणि नमस्कार करून ती व्यक्ती रेल्वेस्थानकात निघून गेली. त्या क्षणी मी परात्पर गुरुदेव आणि सद्गुरु पिंगळेकाका यांच्या श्रीचरणी कृतज्ञता व्यक्त केली अन् सद्गुरु काकांची गाडी फलाटावर लागण्याच्या आत तिथे पोचलो.
भगवंतरूपी गुरुमाऊली कुणाच्याही रूपात येऊन आम्हाला नेहमी साहाय्य करते. ‘त्याबद्दल किती आणि कशी कृतज्ञता व्यक्त करावी ?’, या विचाराने माझी भावजागृती झाली. सदैव आम्हा पामरांना साहाय्य करण्यासाठी तत्पर असणार्या सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलीच्या श्रीचरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. अशोक भागवत, देहली (१९.१०.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |