चिनी अभियंत्यांची हत्या रोखण्यासाठी चीनचे तालिबानला आमीष !
बीजिंग – ‘चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर’ या प्रकल्पात काम करणार्या चिनी अभियंत्यांवर ‘तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’च्या (‘टीटीपी’च्या) आतंकवाद्यांकडून होणारी आक्रमणे रोखण्यात पाकिस्तानी सैन्यदल अपयशी ठरत आहे, असे चीनने म्हटले आहे. चिनी नागरिकांची हत्या रोखण्यासाठी चीनने आता तालिबानकडे धाव घेतली आहे. ‘तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ या आतंकवादी संघटनेला चिनी नागरिकांवर आक्रमण करण्यापासून रोखण्याचे आवाहन चीनने तालिबानला केले आहे. एवढेच नाही तर चीनने तालिबानला मोठे आमीष दाखवले आहे की, जर त्याने ‘टीटीपी’ला आक्रमण करण्यापासून रोखले, तर चीन अफगाणिस्तानमध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करेल. अलीकडेच ‘टीटीपी’च्या आतंकवाद्यांनी चिनी अभियंत्यांची हत्या केली होती आणि पाकिस्तानी सैन्यदल त्यांना रोखण्यात अपयशी ठरले होते.
चिनी वृत्तपत्र ‘मॉर्निंग पोस्ट’च्या वृत्तानुसार, अलीकडच्या दिवसांत अफगाणिस्तान आणि इराण यांच्या सीमेवरून आतंकवादी आक्रमणे होत आहेत. तालिबान ‘टीटीपी’च्या आतंकवाद्यांना प्रोत्साहन देत आहे, असे पाकिस्तानचे म्हणणे आहे. चीनने अफगाणिस्तामध्ये खाणउद्योग आणि इतर क्षेत्रात गुंतवणूक करावी, यासाठी तालिबान सातत्याने प्रयत्न करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर चीनने हे आमीष दाखवले आहे.