सामाजिक माध्यम (सोशल मीडिया) मुलांसाठी धोकादायक ! – इलॉन मस्क

 

इलॉन मस्क

वॉशिंग्टन – मुलांना सामाजिक माध्यमापासून (सोशल मीडियापासून) दूर ठेवणे आवश्यक आहे. सोशल मीडियाचा दीर्घकाळ वापर करणे मुलांसाठी चांगले नाही. सामाजिक माध्यम मुलांसाठी फार धोकादायक आहे, असे विधान ‘एक्स’चे (पूर्वीच्या ट्वीटरचे) सर्वेसर्वा इलॉन मस्क यांनी एका परिषदेत बोलतांना केले.

इलॉन मस्क पुढे म्हणाले, ‘‘मी सर्व पालकांना विनंती करतो की, त्यांनी त्यांच्या  मुलांना सोशल मीडियापासून दूर ठेवावे. मुले ‘एआय अल्गोरिदम’विषयी (‘एआय अल्गोरिदम’ म्हणजे यंत्राला माहितीचे विश्‍लेषण करून त्यावर आधारित निर्णय घेण्यासाठी देण्यात येणारी सूचना) संवेदनशील असतात, जी ‘डोपामाइन’ पातळी वाढवून (जेव्हा डोपामाइनची पातळी वाढते, तेव्हा व्यक्तीमध्ये आनंद, प्रेरणा आदी भावना निर्माण होतात) वापरकर्त्याची क्षमता वाढवण्यासाठी सिद्ध केलेली असतात. सोशल मीडिया आस्थापनांच्या स्पर्धात्मक स्वरूपामुळे तरुणांच्या मनावर घातक परिणाम होत आहेत.’’

मी माझ्या मुलांना सोशल मीडिया वापरण्यापासून कधीच रोखले नाही, ही माझी चूक ! – इलॉन मस्क

इलॉन मस्क यांनी सोशल मीडियाचा मुलांवर होणार्‍या प्रभावाविषयी बोलण्याची ही पहिलीच वेळ नाही. ‘फेसबूक’ आणि ‘इन्स्टाग्राम’ या सामाजिक माध्यमांचा मुलांवर होणार्‍या परिणामाविषयी त्यांनी यापूर्वीही अनेकदा चिंता व्यक्त केली आहे. गेल्या वर्षी दुबईत झालेल्या ‘डब्ल्यू.जी.एस्.’ परिषदेत ते म्हणाले होते की, ‘मी माझ्या मुलांना सोशल मीडिया वापरण्यापासून कधीच रोखले नाही, ही माझी चूक होती.’