पुणे महापालिकेने ५४ सहस्र चौरस फूट विनाअनुमती केलेले बांधकाम पाडले !
मोठी हॉटेल्स, रेस्टॉरंट, रूफटॉप हॉटेल्सवर कारवाई !
पुणे – कल्याणीनगर येथील दुर्घटनेनंतर शहरातील मोठी हॉटेल्स, रेस्टॉरंट, रूफटॉप हॉटेल्समधील विनाअनुमती बांधकामांवर महापालिकेकडून कडक कारवाई करण्यात येत आहे. (मोठी हानी झाल्यावरच कारवाई का होते ? – संपादक) महापालिकेने विनाअनुमती बांधकाम केलेली ६० ठिकाणे निश्चित केली आहेत. त्यातील ५४ ठिकाणी कारवाई करत ५४ सहस्र ३०० चौरस फुटांवरील अतिक्रमणे २२ मे या दिवशी पाडण्यात आली. त्यात कल्याणीनगर, मुंढवा, कोरेगाव पार्क, घोरपडी, रेल्वेस्थानक आणि विमाननगर परिसरातील हॉटेल्सवर कारवाई केल्याची माहिती महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाकडून देण्यात आली. (मोठा अपघात झाल्यावर अशा कारवाया चालू झाल्या, याचा अर्थ अशा कित्येक अवैध आणि भ्रष्ट गोष्टी इथे विनासायास चालू आहेत. त्या सर्वांवर स्वतःहून कारवाई का होत नाही ? – संपादक)
कारवाई केलेल्या हॉटेल्समध्ये ३ मोठी हॉटेल्स, तसेच छोटी हॉटेल्स, दर्शनी आणि सीमा अंतरावरील ४४ हॉटेल्स यांवर, तसेच ७ रूफटॉप हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली.