पोर्तुगालचे नागरिकत्व स्वीकारलेल्या गोमंतकियांनी लोकसभा निवडणुकीत मतदान केल्याची शक्यता
तक्रार आल्यास कारवाई करणार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकार्यांचे आश्वासन
मडगाव, २३ मे (वार्ता.) – गोव्यात ७ मे या दिवशी झालेल्या उत्तर आणि दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान झाले. या वेळी पोर्तुगालचे नागरिकत्व स्वीकारलेल्या काही गोमंतकियांनी मतदान केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याविषयी मुख्य निवडणूक अधिकारी रमेश वर्मा म्हणाले, ‘‘याविषयी अजूनपर्यंत अधिकृतपणे तक्रार नोंद झालेली नाही; मात्र अशी तक्रार आल्यास त्याचे अन्वेषण करून पुढील कारवाई केली जाणार आहे. तक्रारीमध्ये तथ्य आढळल्यास ती तक्रार जिल्हाधिकार्यांना पुढील अन्वेषणासाठी पाठवली जाणार आहे आणि त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाणार आहे.’’ (कुणीतरी शक्यता वर्तवली आहे, तर तक्रारीची वाट न पहाता निवडणूक यंत्रणा त्याची पडताळणी का करत नाही ? – संपादक)
जागरूक नागरिक व्लादिमीर द मोंत फुर्तादो माध्यमाशी बोलतांना म्हणाल्या, ‘‘सामाजिक माध्यमांमध्ये ज्यांनी पोर्तुगालमध्ये त्यांची जन्मनोंदणी केली आहे किंवा ज्यांनी भारतीय पारपत्र समर्पित न करता पोर्तुगीज पारपत्र स्वीकारलेले आहे, अशांनी ७ मे या दिवशी लोकसभा निवडणुकीत मतदान केल्याची शक्यता आहे. भारतीय पारपत्र समर्पित न केल्याने त्यांची नावे मतदारसूचीतून वगळलेली नाहीत. वार्का, बाणावली मतदारसंघ आणि नुवे मतदारसंघ येथे असे घडल्याचे वृत्त आहे.’’ याविषयी एक सरकारी अधिकारी म्हणाला, ‘‘सरकारला हा विषय माहिती असण्याची शक्यता आहे आणि या प्रकरणी अन्वेषणही चालू झाले असावे. काही राजकीय पक्ष हेतूपुरस्सर अशा व्यक्तींची दिशाभूल करत असावे.’’