विनोबा भावे यांच्या ‘गीता प्रवचना’तील ‘गुणोत्कर्ष आणि गुणविस्तार’
अत्यंत एकाग्र मनाने, निष्कामपणे देवाची भक्ती आणि सेवा केल्यावर भक्त गहन मायेच्या पलीकडे तरून जाऊ शकतो !
विनोबा भावे यांची ‘गीता प्रवचने’ नुकतीच वाचनात आली. त्यातील चौदाव्या अध्यायातील ‘गुणोत्कर्ष आणि गुणविस्तार’ या विषयीची मला भावलेली सूत्रे येथे दिली आहेत. ‘साधना करणार्या जिवांना निश्चितच याचा उपयोग होईल’, असे वाटते.
२३ मे २०२४ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘देह आणि आत्मा वेगळे आहेत’, याची जाणीव सतत ठेवायला हवी, देहापासून निग्रहाने आत्मा वेगळा करायचा मार्ग, म्हणजे तम-रज-सत्त्व हे तिन्ही गुण जिंकून घेणे’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.
मागील भाग येथे वाचा → https://sanatanprabhat.org/marathi/796467.html
२ आ. रजोगुण आणि त्यावर उपाय : रजोगुण ही तमोगुणाची दुसरी बाजू आहे. तमोगुणातून रजोगुण भेटतो आणि रजोगुणातून तमोगुणाची भेट होते.
२ आ १. रजोगुणाची लक्षणे
२ आ १ अ. कर्मासक्ती : रजोगुणाचे प्रधान लक्षण, म्हणजे नाना प्रकारचे कार्य करण्याचा हव्यास. अचाट कर्म करण्याची अपार आसक्ती. रजोगुणामुळे लोभात्मक कर्मासक्ती उत्पन्न होते.
२ आ १ आ. स्थिरता नसणे : रजोगुणाचा दुसरा परिणाम म्हणजे माणसात स्थिरता रहात नाही. तात्काळ फळ हवे असते; म्हणून जरा अडथळा येताच मनुष्य हाती घेतलेला मार्ग सोडतो. रजोगुणी मनुष्य ‘हे सोड, ते धर’, अशी सारखी धरसोड करतो. प्रतिदिन नवीन नवीन कार्याची निवड करावी लागते. याचा परिणाम शेवटी हाती काहीच पडत नाही. रजोगुणी मनुष्याच्या कृती चल आणि अनिश्चित असतात. रजोगुणी मनुष्य अधीर असतो. त्याला संयम रहात नाही. एके ठिकाणी स्थिरपणे काम करण्याची त्याला सवयच नसते.
२ आ २. रजोगुण जिंकण्यासाठी आपली सारी शक्ती स्वधर्मात ओतावी ! : रजोगुणामुळे मनुष्याला स्वधर्म रहात नाही. वास्तविक स्वधर्माचरण, म्हणजे इतर नाना कर्मांचा त्याग करणे. मनुष्य आपली सारी शक्ती नाना प्रकारच्या उद्योगांत न दवडता ती एकत्र करून एकाच कार्यात सुव्यवस्थितपणे ओतील, तरच त्याच्या हातून काही कार्य होईल. म्हणून ‘स्वधर्मास’ महत्त्व आहे.
‘स्वधर्म’ हा स्वाभाविक आणि सहज असतो. मनुष्य जन्माला येतो, त्याच वेळी त्याचा स्वधर्मही जन्मतो. मुलाला आई जशी शोधावी लागत नाही, त्याचप्रमाणे स्वधर्म शोधावा लागत नाही. भगवंताकडून तो आगाऊच मिळालेला आहे. ज्या आई-बाबांच्या पोटी जन्मलो त्यांची सेवा, ज्या शेजार्यांमध्ये जन्मतो, त्यांची सेवा. या गोष्टी जिवाला निसर्गतः मिळालेल्या असतात. भूक लागते, तहान लागते. हा धर्म जिवाला ओघानेच लाभलेला असतो. याचाच अर्थ जन्मलो, तेव्हाच ज्या गोष्टी (तहान, भूक, देहाचा वर्ण, कुळ, चरितार्थासाठी करावयाचा कामधंदा इत्यादी) जिवाला प्राप्त झालेल्या असतात. ‘त्या जीवनभर करत रहाणे’, हा ‘स्वधर्म’ होय. जगाच्या पाठीवर सर्वत्र आणि प्रत्येकालाच स्वधर्म प्राप्त झालेला आहे.
स्वधर्माचे सतत चिंतन करून त्यातच सर्व शक्ती वेचली पाहिजे. हीच स्वधर्माची कसोटी आहे. फळाकडे लक्ष न ठेवता केवळ स्वभावप्राप्त अपरिहार्य असा स्वधर्म आचरणे आणि त्याद्वारे चित्तशुद्धी करत रहाणे, हा खरा कर्मयोग आहे. अशा स्वधर्मरूप कर्तव्यात फार शक्ती असते. आपण सारे एका प्रवाहात, एका विशिष्ट परिस्थितीसह जन्माला येतो. त्यामुळे स्वधर्माचरणरूप कर्तव्य प्रत्येकाला आपोआपच प्राप्त झालेले असते.
प्राप्त स्वधर्म साधा असला, कमी वाटला, निरस भासला, तरी जो मला प्राप्त होतो, तोच भला. तोच सुंदर. मनुष्यास दूरचे आकर्षण वाटत असते; परंतु हा मोह आहे. हा टाळलाच पाहिजे. समुद्रात बुडणार्याला समजा एखादा ओबडधोबड ओंडका मिळाला, तो जरी पॉलिश केलेला, गुळगुळीत, सुंदर नसला, तरी तोच त्याला तारील. त्याचप्रमाणे जी सेवा मला प्राप्त झाली, ती जरी गौण वाटली, तरी तीच माझ्यासाठी उपयोगी असून तिच्यात मग्न होऊन रहाण्यातच आपला उद्धार आहे.
रजोगुण जिंकण्यासाठी आपली सारी शक्ती स्वधर्मात ओतावी, म्हणजे मग रजोगुणाची धावपळ करण्याची वृत्ती नाहीशी होते. चंचलत्वाची नांगीच मोडली जाते. स्वधर्मात मग्न झाले, म्हणजे रजोगुण फिका पडतो; कारण चित्त तेथे एकाग्र होते. स्वधर्माव्यतिरिक्त चित्त कुठेही जात नाही. त्यामुळे चंचल रजोगुणाचा सारा जोरच जिरून जातो. अशा प्रकारे रजोगुण जिंकायचा.
२ इ. सत्त्वगुण आणि त्यावर उपाय : सत्त्वगुण प्राप्त करण्यासाठी रज-तम गुणांचा संपूर्ण उच्छेदच करावा लागतो. आता रज-तम गेल्यावर उरला सत्त्वगुण. शरीर आहे, तोपर्यंत कुठल्या तरी भूमिकेवर रहाणे प्राप्त असते. रज-तम गुणांच्या तुलनेत सत्त्वगुणांची भूमिका जरा निराळी आहे.
२ इ १. सत्त्वगुणापासून आत्म्याला वेगळे कसे करायचे ? : जेव्हा सत्त्वगुण अधिक प्रमाणात असतो, तेव्हा त्या सत्त्वगुणाचा जिवाला अभिमान जडतो. हा अभिमान शुद्ध स्वरूपापासून आत्म्याला खाली पाडतो.
एखाद्या कंदिलातील ज्योतीचा प्रकाश स्वच्छपणे बाहेर पडावा; म्हणून आतील काजळी पुसावी लागते. काजळी पुसून टाकली; परंतु काचेवर धूळ बसली आहे, तर तीही पुसावी लागते. त्याचप्रमाणे आत्म्याच्या प्रभेभोवती जी तमोगुणरूपी काजळी असते, ती दूर केलीच पाहिजे. नंतर रजोगुणरूपी धूळही साफ केली पाहिजे. मग शुद्ध सत्त्वगुणरूपी काच रहाते. आता हा सत्त्वगुणही दूर करायचा, तर काय काच फोडायची का ? नाही. काच फोडल्याने दिव्याचे कार्य होणार नाही. ज्योतीचा प्रकाश पसरण्यासाठी काच हवीच. ही शुद्ध चकचकीत काच फोडून न टाकता, डोळे तिच्यामुळे दिपून जाऊ नयेत; म्हणून लहानसा कागदाचा तुकडा आड धरायचा. असे करून डोळे दिपू द्यायचे नाहीत.
२ इ १ अ. सत्त्वगुण जिंकणे म्हणजे त्याविषयीचा अभिमान दूर करणे : सत्त्वगुण जिंकणे, म्हणजे त्याबद्दलचा अभिमान किंवा त्याविषयीची आसक्ती दूर करणे. जीवनयापन (जीवन व्यतीत) करतांना सत्त्वगुण वापरायचाच, सत्त्वगुणाची कर्मे सतत करत रहायची; परंतु सत्त्वगुणाला निरहंकारी करायचे. सत्त्वगुणाचा अहंकार जिंकायचा.
२ इ १ आ. सत्त्वगुणाचा अहंकार कसा जिंकावा ? : ‘सत्त्वगुणाचा अहंकार जिंकायचा कसा ?’, यासाठी एक उदाहरण पाहूया, म्हणजे सत्त्वगुणाचा अभिमान कसा दूर करायचा, हे अधिक स्पष्ट होईल. काजवा प्रकाशाची उघडझाप करत असतो. त्यातच त्याची ऐट असते. काजव्याचा प्रकाश सतत राहील, तर त्याची ऐट रहाणार नाही. जी क्रिया आपल्या हातून कधीतरीच होते, तिचा आपल्याला अभिमान वाटतो. ती गोष्ट आपल्याला महत्त्वाची वाटते; मात्र २४ घंटे श्वासोच्छ्वास चालू आहे, ते आपण येणार्या-जाणार्याला सांगत नाही. ‘मी श्वासोच्छ्वास करणारा थोर प्राणी !’, अशी प्रौढी कुणी मिरवत नाही, म्हणजेच काय, तर सातत्यात विशेष वाटेनासे होते. सत्त्वगुण फिका पाडण्यासाठी, त्याचा अहंकार जिंकण्यासाठी एक युक्ती करायची. सत्त्वगुणाची कर्मे सतत करून तो स्वभावच करून टाकायचा. सत्त्वगुण आपल्या क्रियांमधून सतत प्रकट होऊ लागला, तर पुढे तो आपला स्वभावच होईल. त्यात सातत्य आणायचे, म्हणजे मग तो आपला स्थायीभाव बनतो. सातत्याने सत्त्वगुणी कर्मे करत राहिल्याने सत्त्वगुणाचा अभिमान जातो. सत्त्वगुण सर्व रोमरोमांत भिनवून घ्यायचा. आपला स्वभावच सत्त्वगुणी बनला, म्हणजे मग आपल्याला त्याचा अहंकार वाटत नाही.
२ इ १ इ. सत्त्वगुणाची आसक्ती कशी दूर करावी ? : अशा प्रकारे सत्त्वगुणाचा अहंकार गेला, तरी आसक्ती रहाते. अहंकार आणि आसक्ती या दोन निरनिराळ्या वस्तू आहेत. आपल्याला श्वासोच्छ्वासाचा अभिमान वाटत नाही; परंतु आसक्ती फार मोठी असते. ‘पाच मिनिटे श्वासोच्छ्वास करू नका’, असे म्हटले, तर होत नाही. नाकाला श्वासोच्छ्वासाचा अभिमान वाटत नसेल; परंतु श्वास हवा असतो. नाक सारखे श्वासोच्छ्वास घेत असते. तात्पर्य काय, तर नाकाला श्वासोच्छ्वासाचा अहंकार नाही; परंतु आसक्ती मात्र आहे. सत्त्वगुणांचीही अशीच आसक्ती असते. सत्त्वगुणांची ही आसक्तीसुद्धा सोडायची.
अशा प्रकारे सत्त्वगुणांची आसक्ती सोडल्यानंतर जीवनात सत्त्वगुण स्थिर होतो. पुढे त्याचे फळ कधी सिद्धीच्या रूपाने, तर कधी कीर्तीच्या रूपाने समोर उभे रहाते. हे फळही तुच्छ लेखावे; आंब्याचे झाड स्वतः त्याचे एकही फळ खात नाही. ते फळ कितीही मोहक असो, रसाळ असो, ते खाण्यापेक्षा न खाणेच त्या झाडाला मधुरतर वाटत असते. नेहमी लक्षात ठेवावे, ‘उपभोगापेक्षा त्याग गोड आहे !’
अशा प्रकारे रज-तम गुणांचा उच्छेद करून सत्त्वगुणी बनलो, अहंकार जिंकला, फलासक्ती सोडली, तरीही जोपर्यंत हा देह आहे, तोपर्यंत रज-तमांची आक्रमणे होतच रहातात. हे गुण जिंकले असे घटकाभर वाटले, तरी ते परत जोर करून येतात, त्यासाठी सतत जागृत राहून दक्षता बाळगली पाहिजे. असे म्हणतांना मनुष्याने कितीही दक्षता बाळगली, तरी जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही, आत्मदर्शन नाही, तोपर्यंत या गुणांचा धोका असतोच. त्यामुळे आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी सारी धडपड असायला हवी.
३. भगवंताची अत्यंत जिव्हाळ्याने आणि कळकळीने भक्ती करणे हाच एकमेव उपाय !
यावर उपाय एकच आहे, तो म्हणजे भगवंताची अत्यंत जिव्हाळ्याने आणि कळकळीने भक्ती करणे. शेवटी त्या परमेश्वराची कृपा पाहिजेच. जिव्हाळ्याच्या भक्तीने त्याच्या कृपेस पात्र झाले पाहिजे. याविना दुसरा उपाय नाही. म्हणूनच भगवंताने अर्जुनाला सांगण्याचे निमित्त करून आपल्याला सांगितले आहे, ‘अत्यंत एकाग्र मनाने, निष्कामपणे माझी भक्ती कर. माझी सेवा कर. जो अशी सेवा करतो, तो या गहन मायेच्या पलीकडे तरून जाऊ शकतो. हा भक्तीचा सोपा उपाय आहे आणि हा एकच मार्ग आहे.
(समाप्त)
– श्री. प्रकाश मराठे (वय ७९ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.