BJP To Get 300 Seats : भाजपला ३०० हून अधिक जागा मिळतील !
प्रशांत किशोर आणि अमेरिकेतील राजकीय विश्लेषक इयान ब्रेमर यांचा अंदाज
नवी देहली – लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या ४ जूनला लागणार आहे. आतापर्यंत देशात मतदानाचे ७ पैकी ५ टप्पे पूर्ण झाले आहेत. ५ टप्प्यांमधील मतदानावरून कोणत्या पक्षाला बहुमत किंवा अधिक जागा मिळतील ?, याची चर्चा चालू आहे. या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध राजकीय विश्लेषक आणि रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी त्यांचा अंदाज वर्तवला आहे. त्यांच्या अंदाजानुसार भाजपला ३०० पेक्षा अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजपने वर्ष २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत २८२, तर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ३०३ जागा जिंकल्या होत्या.
BJP To Get more than 300 Seats
Prediction by Prashant Kishore and American Political scientist Ian Bremmer#LoksabhaElections2024pic.twitter.com/FKeQ2RMYSt
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 23, 2024
प्रशांत किशोर यांनी हा अंदाज वर्तवला असतांना अमेरिकेतील विश्लेषकांकडूनही अंदाज वर्तवले जात आहेत. अमेरिकेतील निवडणुकांचे अभ्यासक, राजकीय संशोधक तथा रणनीतीकार इयान ब्रेमर यांनी भारतातील एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ‘भाजपला ३०५ हून १० अधिक किंवा अल्प जागा मिळतील’, असे म्हटले आहे, म्हणजेच भाजप अधिकाधिक ३१५ किंवा कमीत कमी २९५ जागा जागा जिंकू शकते.
ब्रेमर यांना सांगितले की, जगभरातील निवडणुकांचा अभ्यास केल्यावर लक्षात येते की, भारतातील सार्वत्रिक निवडणुका स्थिर वातावरणात चालू आहेत, अन्यथा जगभरातील इतर देशांमधील निवडणुकांमध्ये मोठा गोंधळ पहायला मिळाला. त्या निवडणुकांमध्ये आम्ही अनेक समस्या पाहिल्या आहेत. जगभरातील बहुतांश भागात भू-राजकीय (जियोपॉलिटिकल) अस्थिरता पहायला मिळते. मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय आस्थापनांना अपेक्षित असलेले जागतिकीकरणाचे भविष्य सध्या तरी दिसत नाही. राजकारणाने जागतिक बाजारपेठेत प्रवेश केला आहे.