निवडणुकीच्या कामामुळे नवी मुंबई महापालिकेचे कार्यालयीन कामकाज विस्कळीत !
नागरिकांना मनःस्ताप
नवी मुंबई – निवडणुकीच्या कामासाठी गेलेल्या महापालिकेच्या कर्मचार्यांमुळे शहरातील कार्यालयीन कामकाज काही प्रमाणात विस्कळीत झाले होते. ‘मतदानानंतर महापालिकेचे कार्यालयीन कामकाज चालू असेल’, असे वाटल्याने अनेक नागरिक विभाग कार्यालय, तसेच महापालिका मुख्यालय येथे आले होते; मात्र अद्याप संबंधित कर्मचारी कामावर आलेले नाहीत. परिणामी शहरातील नागरिकांचे काम होऊ शकले नाही. त्यांना विनाकारण मनःस्ताप झाला.
नवी मुंबई महानगरपालिकाचे ९०० हून अधिक कर्मचारी आणि अधिकारी या निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त करण्यात आले होते. त्यातील १५० ते २०० कर्मचारी गेल्या १ महिन्यापासून साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकार्यांच्या कार्यालयामध्ये विविध कामांकरिता नियुक्त करण्यात आले होते. या कर्मचार्यांकडे असलेल्या कामांसंदर्भात नागरिकांनी विचारणा केली असता ‘संबंधित अधिकारी निवडणुकीच्या कामाला गेले आहेत’, असे सांगण्यात यायचे. त्यामुळे नागरिकांच्या कामांचा खोळंबा झाला.
उपायुक्त शरद पवार म्हणाले, ‘‘मतदानाच्या कामासाठी जे कर्मचारी गेले आहेत, त्यांना मतदानाच्या दुसर्या दिवशी सुट्टी असते. त्यामुळे ते कामावर आले नाहीत.’’
संपादकीय भूमिका :कामकाज कधीपासून चालू होईल, याची पूर्वकल्पना महापालिकेने नागरिकांना का दिली नाही ? |