सांगली महापालिकेची नालेस्वच्छता युद्धपातळीवर चालू !
पुढील २० दिवसांत उर्वरित नालेस्वच्छता पूर्ण होणार !
सांगली, २२ मे (वार्ता.) – सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून मान्सूनपूर्व नालेस्वच्छता युद्धपातळीवर हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत आतापर्यंत ६० टक्के नाले स्वच्छ करण्यात आले आहेत, तर उर्वरित नालेस्वच्छताही पुढील २० ते २५ दिवसांमध्ये पूर्ण होणार आहे. पावसाळ्यापूर्वी महापालिका क्षेत्रातील सर्व नाले हे पूर्ण क्षमतेने स्वच्छ करावेत, अशा सूचना आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी संबंधित ठेकेदाराला दिल्या आहेत.
महापालिका क्षेत्रात एकूण ९७ नैसर्गिक नाले ६५ किलोमीटरच्या अंतरावर पसरलेले आहेत. २५ एप्रिल या दिवशी आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या आदेशानुसार ठेकेदार स्वप्नील सर्जे यांनी नालेस्वच्छता कामाला प्रारंभ केला होता. या २६ दिवसांमध्ये मक्तेदार सर्जे यांनी ६० टक्के नालेस्वच्छता पूर्ण केली आहे. सध्या महापालिका क्षेत्रात उर्वरित नालेस्वच्छता पुढील २० दिवसांत पूर्ण केली जाणार आहेत.
मान्सूनपूर्वी महापालिका क्षेत्रातील मुख्य नाले हे स्वच्छ आणि रुंद व्हावेत, तसेच कोणत्याही प्रकारे शहरात पाणी साचू नये अशा सूचना आयुक्त शुभम गुप्ता यांनी प्रशासनाला केल्या होत्या. त्यानुसार संबंधित ठेकेदारांना आपल्या नालेस्वच्छतेचे काम जोमाने चालू केले आहे. मान्सूनपूर्वी सर्व नाले हे पूर्ण क्षमतेने स्वच्छ आणि रुंद करावेत जेणेकरून पावसाळ्यात उपनगरातील पाणी नाल्याच्या द्वारे वाहून जाण्यात कोणतेही अडथळे निर्माण होणार नाहीत याची काळजी संबधित मक्तेदारांनी घ्यावी, अशी सूचनाही आयुक्त गुप्ता यांनी केली आहे.