देवभक्ती आणि राष्ट्रभक्ती महत्त्वाची ! – शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी
शंकराचार्य पीठाचे पुरस्कार वितरण
कोल्हापूर – देवभक्ती आणि राष्ट्रभक्ती या दोन्हींचा समन्वय साधण्यासाठी धर्म सहकार्य करतो. धर्माचे रक्षण करण्यासाठी परंपरा आणि धर्माधिष्ठित कर्माची सांगड घालावी लागते. ज्यामुळे धर्म आणि राष्ट्र यांचे उत्थान होते. त्यामुळे देवभक्ती आणि राष्ट्रभक्ती महत्त्वाची आहे, असे आशीर्वचन शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी यांनी दिले. येथील शंकराचार्य पीठामध्ये आद्यशंकराचार्यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा पुरस्कार देऊन स्वामींच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्या वेळी स्वामीजी बोलत होते.
वैदिक पुरस्कार-राघव रामदासी यांना, तर सांस्कृतिक पुरस्कार-गोविंद शास्त्री जोशी, स्थानिक वैदिक पुरस्कार-संदीप काजरेकर, सामाजिक गौरव-संभाजी तथा बंडा साळुंखे, महिला कीर्तनकार-अस्मिता अरुण देशपांडे, होतकरू विद्यार्थी-वाचस्पती कुलकर्णी आणि श्रीवल्लभ गुरुप्रसाद पुजारी, उत्कृष्ट शासकीय कर्मचारी-डी.वाय. पाटील असे पुरस्कार प्रदान करण्यात आले. याचसमवेत विशेष पुरस्काराने सौ. अनघा महेश कुलकर्णी यांना गौरवण्यात आले आणि महेंद्र इनामदार, प्रमोदशास्त्री कुलकर्णी यांचाही सत्कार स्वामीजींच्या हस्ते करण्यात आला.
अध्यक्ष सुरेश कुलकर्णी यांनी स्वागत केले. सचिव शिवस्वरूप भेंडे यांनी प्रास्ताविकात पीठाच्या वतीने राबवण्यात येणार्या उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन नंदकुमार मराठे आणि प्रमोदशास्त्री कुलकर्णी यांनी केले. रामकृष्ण देशपांडे यांनी आभार मानले. या प्रसंगी भक्तगण उपस्थित होते. २३ मे या दिवशी पालखी प्रदक्षिणा आणि महाप्रसाद होऊन उत्सवाची सांगता होणार आहे.