सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील ५६ लाख रुपयांच्या दुष्काळ निधी अपहार प्रकरणी ३ कर्मचारी निलंबित !
सांगली, २२ मे (वार्ता.) – सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तासगाव मार्केट यार्ड शाखेत शासनाकडून मिळालेल्या दुष्काळ साहाय्य निधीतील ५६ लाख ३३ सहस्र रुपये रकमेचा अपहार केल्याच्या प्रकरणी शाखेचे कर्मचारी योगेश वजरीनकर, प्रमोद कुंभार आणि शाखाधिकारी एम्.व्ही. हिले यांना निलंबित करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. एकाच ठिकाणी ५ वर्षांहून अधिक काम करणार्या कर्मचार्यांचे स्थानांतर करण्याचा, तसेच जिल्ह्यातील शाखांची ६ पथकांद्वारे येत्या आठवड्यात पडताळणी करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.
या संदर्भात मानसिंग शिंदे म्हणाले की, जिल्हा बँकेत विविध शासकीय योजनांचा निधी जमा होतो. त्यावर यापूर्वी संबंधित शाखा प्रमुखांचे नियंत्रण होते. यापुढे सर्व शासकीय निधीवर मुख्यालयाचेच नियंत्रण राहील. खातेच बंद असेल. अनुमतीविना त्या खात्यावर व्यवहार होणार नाहीत, याची काळजी घेतली जाईल. अशा घटना टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच शाखांच्या पडताळणीचा निर्णय घेतला आहे.