मानवी जीवनाच्या कल्याणाचा राजमार्ग वेदांमध्ये असून वैदिक धर्म हा त्यातील सिद्धांतांनी चालतो !
१. भारताच्या एका नदीच्या नावावरून आमच्या महाकाय देशातील सर्वांना ओळखणे, हे अज्ञान असणे
‘हिंदु’ हा शब्द भौगोलिक आहे. सिंधु या शब्दाचे ते अपभ्रष्ट (अयोग्य) रूप आहे. पूर्वी ग्रीकांनी वायव्येकडून भारतावर आक्रमण केले. तेव्हा सिंधु तिरावरील लोकांना ते ‘सिंधू’ तथा ‘हिंदू’ म्हणू लागले. ‘हप्त हिंदू’ (उर्फ सप्तसिंधु) हा शब्द झेंद् अवेस्तामध्ये (पर्शिया) आणि एका पर्शियन शिलालेखावर सर्वप्रथम आढळतो. ‘सिंधू तिरावरील लोक, ते हिंदू’, असे समजले जाऊ लागले; परंतु हा त्या परकियांनी वापरलेला शब्दप्रयोग आहे. हे आमच्या धर्माचे वा जातीचे नाव नाहीच नाही ! आमचा धर्म ‘सनातन धर्म’ आहे आणि तो ईश्वरनिर्मित आहे. ‘पदार्थांच्या निश्चित गुणधर्माचा विश्वकल्याणार्थ उपयोग, कार्यकारणभाव आणि जिवाचे ईश्वराशी तद्रूप होण्याचे अंतिम साध्य’, हाच या धर्माचा पाया आहे.
आमच्या भारताच्या एका नदीच्या नावावरून आमच्या महाकाय देशातील सर्वांना ओळखणे आणि त्यांना सरसकट ‘हिंदू’ म्हणणे, हे त्या परकियांचे अज्ञान असून आजही त्याच भौगोलिक अर्थाच्या पदाचा आमच्या धर्माचे नाव म्हणून स्वीकारणे, हे आमचेही अज्ञानच आहे.
२. ईश्वरनिर्मित धर्मांची नावे
२ अ. मानव धर्म : आमच्या धर्माला खरे तर ‘मानव धर्म’ हेच नाव शोभेल; कारण सर्व मानवमात्रासाठी हा धर्म आहे आणि तो मनुप्रणीतही आहे.
२ आ. सनातन धर्म : हा नित्य, नूतन, सदाहरित (एव्हरग्रीन) आणि शाश्वत सिद्धांत सांगणारा असल्यामुळे ‘सनातन धर्म’ आहे.
२ इ. ईश्वरी धर्म : ईश्वरानेच निर्माण केलेला असल्याने हा ‘ईश्वरी धर्म’ आहे.
२ ई. शाश्वत धर्म : शाश्वत असल्याने हा ‘शाश्वत धर्म’ आहे.
२ उ. वैदिक धर्म : हा वेदप्रतिपादित असल्याने हा ‘वैदिक धर्म’ आहे.
२ ऊ. आर्य सनातन वैदिक धर्म : हिंदु नावाचा धर्म या विश्वात नाही आणि तरीही कुणाचे ‘हिंदु’ या शब्दावर प्रेमच असेल, तर ‘हिंदु धर्म’ म्हणवला जाणारा तो धर्म ‘आर्य सनातन वैदिक धर्म’च आहे. अन्य नाही; कारण सारे जग ‘हिंदू’ म्हणून ज्या माणसाला संबोधते, त्याला वेदानुयायी, वर्णाश्रमधर्मी, गोपूजक, पुनर्जन्मवादी, मूर्तीपूजक इत्यादी वैदिकांच्याच लक्षणांनी युक्त असाच समजते.
पोथीनिष्ठता कितपत योग्य आहे ? : ‘सारे जग पोथीनिष्ठच असते. मुसलमानांची ‘कुराण’वर, ख्रिस्त्यांची ‘बायबल’वर आणि बौद्धांची ‘धम्मपदा’वर श्रद्धा आहे. जगात कोणता धर्म हा धर्म-ग्रंथाविना, म्हणजेच पोथीविना आहे ?
जिच्यावर आपली निष्ठा आहे, तिच्यानुसार आचरण करून कल्याण साधावे. अशी पोथी, असे धर्मग्रंथ, वेद, उपनिषदे आणि भगवद्गीतेसारखे ग्रंथ आम्हालाच लाभले आहेत, हे आमचे भाग्य ! ज्या ग्रंथांतील सिद्धांतांना वैज्ञानिक प्रगतीचे वावडे नाही, ज्यांतील विचार परिपक्व आणि निश्चित हितावह आहेत, ज्यांचे आचरण आजतागायत सर्वांना हितावहच झाले आहे, सहस्रावधी वर्षे ज्यांनी एका महान संस्कृतीला जोपासले आहे आणि ज्यांच्यापासून दुरावायला लागताच सांस्कृतिक अधःपतन चालू होत आहे, अशा वेदांसारख्या महान ग्रंथांनी प्रतिपादित केलेले विचार ‘केवळ पोथीनिष्ठतेचा आळ येईल’, या भीतीने त्याज्य ठरतील काय ?’
– शेवडेंची अमेरिकेतील प्रवचने (हग्यूस्टन (टेक्सास)१.९.१९८०)
३. वैदिक धर्म हा वेदांमध्ये नमूद केलेल्या सिद्धांतांनी चालतो !
सारे जग वैदिकच आहे. ‘आपण वेदातील सिद्धांत स्वीकारतो’, हे ठाऊक नसले, तरी जगातील सर्व लोक कळत-नकळत वैदिक सिद्धांतांनीच चालत आहेत. पित्याचे धन पुत्राला मिळावे, कुटुंबप्रमुखाने कुटुंबाचे हित पहावे, अज्ञानी बालकांना त्यांच्या पित्याने आणि वृद्ध न कमावत्या आई-वडिलांना त्यांच्या मुलाने सांभाळावे, हे आणि असे सारे भौतिक जीवनव्यवहार याच वैदिक धर्माने जगाला दिले आहेत. ईश्वरविषयक कल्पना, भक्तीने त्याला शरण जाणे, त्याच्या कृपेसाठी धडपड करणे, पाप-पुण्य आणि जीव-आत्मा इत्यादी सर्व आध्यात्मिक विचारही याच धर्माकडून सार्या जगाला मिळाले आहेत. ज्योतिषशास्त्र, ग्रहगती-शास्त्र, कालगणनाशास्त्र, विवाह, इतकेच नव्हे, तर सर्व मानवी जीवनाशी संबंधित नियम, शास्त्रे, कायदे, सदाचार, धर्म, नीती इत्यादींचे उगमस्थान वेदच आहेत; म्हणून सारे जग वैदिकच आहे. मानवी जीवनाच्या कल्याणाचा राजमार्ग वेदांत आहे. त्याच्या आसपास असणार्या पायवाटांनी चालणारे ठेचकाळत रहाणार; पण हमरस्त्यावर चालणारे मात्र सुगमपणे कल्याणाप्रत जाणार आहेत.’
– शेवडेंची अमेरिकेतील प्रवचने (हग्यूस्टन (टेक्सास) १.९.१९८०)