मुंबईत मतदानाची टक्केवारी न्यून होण्यामागे मोठे षड्यंत्र !
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आरोप !
मुंबई – मुंबईत मतदानाची टक्केवारी न्यून झाली. याला निवडणूक आयोगाचा अनागोंदी कारभार आणि निष्काळजीपणा उत्तरदायी आहे. पिण्याच्या पाण्याची गैरसोय, मतदान केंद्रावर मंडप नसणे, भ्रमणभाष बंदीमुळे नागरिकांमध्ये नाराजी याकडे सरकारचे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झाले. यामागे मोठे षड्यंत्र आहे. तसेच मर्जीतील निवडणूक अधिकारी बसवण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचे स्थानांतर करण्याचा सरकारने डाव रचला, असा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषेदेत केला.
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचे स्थानांतर का करण्यात आले, सत्ताधार्यांना साहाय्य करण्याची भूमिका निवडणूक आयोग आणि पोलीस यांनी घेतली आहे का ?, याची निःपक्षपातीपणे उच्च स्तरीय चौकशी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार घेणार राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकार्यांची भेट !मुंबईत मतदानाच्या दिवशी पुष्कळ दिरंगाई झाली. मतदान प्रक्रिया संथ गतीने राबवण्यात आली होती. परिणामी मतदानाचा टक्का घसरला, असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. या प्रकरणी महाविकास आघाडीचे मुंबईतील सर्व उमेदवार हे राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयात जाऊन अधिकार्यांना भेटणार आहेत. |