योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन सूक्ष्म रूपात समवेत असल्याविषयी श्री. अतुल पवार यांना आलेली प्रचीती !
२३.५.२०२४ (वैशाख पौर्णिमा) या दिवशी योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने…
योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या चरणी सनातन परिवाराचा कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
१. योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांनी देहत्याग केला असला, तरी ‘ते सूक्ष्म रूपाने समवेत आहेत’, असे जाणवणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘योगतज्ञ दादाजींचे कार्य सूक्ष्म स्तरावर चालू आहे’, असे सांगणे
‘२०.५.२०१९ या दिवशी योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांनी देहत्याग केला असला, तरी मला त्यांचे सूक्ष्म रूपाने अस्तित्व जाणवते. त्यांनी देहत्यागापूर्वीच सांगून ठेवले होते, ‘‘मी नंतर (देहत्यागानंतर) सूक्ष्म रूपाने असणार !’’ योगतज्ञ दादाजींनी देहत्याग केल्याला ४ वर्षे पूर्ण झाली असली, तरीही मला त्यांची आठवण येते. मला पदोपदी जाणवते, ‘ते सूक्ष्म रुपाने माझ्या समवेत आहेत’ आणि मला तशा पुष्कळ अनुभूतीही येत आहेत. मला जाणवते, ‘ते मला सूक्ष्मातून वेगवेगळ्या माध्यमांतून शिकवत आहेत.’ डिसेंबर २०२२ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले म्हणाले, ‘‘दादाजींचे कार्य आता सूक्ष्म स्तरावर चालू आहे.’’
२. पशुपतिनाथाचे दर्शन घेण्यासाठी नेपाळ येथे जाणे, नेपाळ येथे पुष्कळ पाऊस पडून दरडी कोसळत असणे, साधक नेपाळमध्ये गेल्यावर योगतज्ञ दादाजी यांच्या कृपेने पाऊस थांबणे अन् प्रवासात कसलीही अडचण न येणे
ऑक्टोबर २०२२ मध्ये योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या कृपेने त्यांच्या स्नुषा सौ. ललिता वैशंपायन आणि काही साधक यांच्या समवेत मला नेपाळ येथील पशुपतिनाथ यांच्या दर्शनाला जाण्याची संधी मिळाली. एक मास आधीच आमच्या प्रवासाच्या तिकिटांचे आरक्षण केले होते. ७.१०.२०२२ या दिवशी आम्ही नेपाळमध्ये प्रवेश केला. तेव्हा २ दिवसांपूर्वीच त्या ठिकाणी डोंगराळ भागांमध्ये पुष्कळ पाऊस पडून दरडी कोसळल्या होत्या; पण आम्ही नेपाळमध्ये गेल्यानंतर पाऊस पूर्णपणे थांबून ऊन पडले होते. आम्हाला पाऊस येणे किंवा मार्ग बंद होणे, अशा प्रकारच्या कोणत्याही अडचणींना गुरुकृपेने सामोरे जावे लागले नाही. योगतज्ञ दादाजींनी आमच्या समवेत प्रवासात असल्याची पदोपदी साक्ष दिली. ‘ते माझ्या समवेत आहेत आणि सर्व पहात आहेत’, असे मला जाणवायचे.
३. नेपाळमधील मनोकामनादेवीच्या दर्शनाच्या वेळी आलेली अनुभूती
३ अ. मंदिर उंच पर्वतावर असणे, मंदिरात दर्शनासाठी पुष्कळ गर्दी असल्याने सर्वांनी बाहेरून दर्शन घेण्याचे ठरवणे : नेपाळमधील पोखरा या शहरापासून काठमांडू येथे जातांना वाटेत मनोकामनादेवीचे मंदिर लागते. मनोकामनादेवी, म्हणजेच पार्वतीदेवी. हे मंदिर उंच पर्वतावर आहे. त्या ठिकाणी जाण्यासाठी ‘रोप-वे’ने जावे लागते. आम्ही मंदिरात जाण्यासाठी पर्वताच्या पायथ्याशी जेथून ‘रोप-वे’ चालू होतो, तेथे आलो. तेव्हा आम्हाला आमच्या प्रवासाचे नियोजन करणार्या व्यक्तीने सांगितले, ‘‘मनोकामनादेवीच्या मंदिरात पुष्कळ गर्दी आहे. तेथे अनुमाने २ कि.मी. इतकी रांग आहे. आपल्याला थांबायला तेवढा वेळ नाही; कारण पुढील प्रवासाला निघायचे आहे. पुढील सर्वच प्रवास हा डोंगराळ भाग आणि वेडीवाकडी वळणे यातून करावा लागणार असल्यामुळे मुक्कामी पोचायला वेळ लागतो. त्यामुळे सर्वांनी बाहेरून दर्शन घेऊन १५ – २० मिनिटांत परत येऊया.’’ मी योगतज्ञ दादाजींना मनोमन प्रार्थना केली, ‘दादाजी, मी एवढ्या दूर आलो आहे. मनोकामनादेवीचे जवळून दर्शन झाले असते, तर बरे झाले असते.’
३ आ. मंदिरात जाण्यासाठी ‘केबल कार’मध्ये बसण्यापूर्वी साधकाला ‘त्याच्या डाव्या हाताच्या अनामिकेला पिवळ्या रंगाची विभूती लागली आहे’, असे दिसणे आणि ‘त्या माध्यमातून योगतज्ञ दादाजी समवेत आहेत’, असे जाणवणे : ‘मला अंतर्मनातून ‘दादाजींच्या आशीर्वादाने आलो आहे, तर मनोकामनादेवीचे दर्शन होईल’, असे वाटत होते. आम्ही तिकीट काढून देवीच्या मंदिरात जाण्यासाठी ‘रोप-वे’च्या ‘केबल कार’कडे आलो. गर्दी असल्यामुळे ‘केबल कार’मध्ये बसण्यासाठी रांग होती. ‘केबल कार’ समोर आली आणि त्यात एकेक करून भाविक बसत होते. मी ‘केबल कार’मध्ये बसायच्या काही क्षण आधी माझे लक्ष माझ्या डाव्या हाताच्या बोटांकडे गेले. तेव्हा मला ‘अनामिकेला (करंगळीच्या बाजूचे बोट) पिवळ्या रंगाची विभूती लागली आहे’, असे दिसले. मला आश्चर्य वाटले. योगतज्ञ दादाजींकडे जशी सूक्ष्मातून विभूती यायची, तशीच ही विभूती होती. मी ‘केबल कार’मध्ये बसल्यानंतर ती विभूती सौ. ललिताकाकूंना आणि समवेतच्या साधकांना दाखवली. तेव्हा सौ. ललिताकाकू म्हणाल्या, ‘‘दादाजींच्या विभूतीसारखीच ही विभूती वाटते आणि तिला गंधही येत आहे.’’ त्यांचे बोलणे ऐकून माझ्या शरिरावर रोमांच आले. मी समवेत विभूती आणली नव्हती. त्यामुळे मी विभूती लावण्याचा प्रश्नच नव्हता. मला पूर्ण निश्चिती झाली की, ‘ही योगतज्ञ दादाजींची कृपा आहे आणि ते माझ्या समवेत असल्याची साक्ष आहे.’
३ इ. रांगेत उभे न रहाता मंदिरात जाऊन दर्शन घेण्यासाठी पोलिसांनी सहसाधकांना अनुमती न देणे; मात्र ‘पोलिसांनी साधकाला अनुमती देणे आणि साधकाला थेट गाभार्यात जाऊन देवीचे दर्शन घेता येणे अन् पुजार्यांनी प्रसाद देणे’, ही योगतज्ञ दादाजींची कृपा असणे : माझ्या समवेत असलेल्या वयस्कर साधिकेने दर्शनासाठी रांगेत उभे रहाण्याऐवजी थेट मंदिरात सोडण्यासाठी तेथील एका पोलिसांना विनंती केली; पण त्यांनी ती मान्य केली नाही. आमच्यातीलच काही जण त्यांना विनवणी करत होते; पण ते कुणाचेच ऐकत नव्हते. तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘मंदिराला प्रदक्षिणा घालून बाहेरून कळसाचे दर्शन घेऊन निघूया.’ मी मंदिराला प्रदक्षिणा घातली आणि कळसाला नमस्कार केला. तेव्हा मला वाटले, ‘मला दर्शनासाठी जाऊ देण्याविषयी त्या पोलिसांना परत विचारूया.’ त्याप्रमाणे मी त्या पोलिसांना सांगितले, ‘‘मला आत देवीच्या दर्शनाला जायचे आहे.’’ तेव्हा त्यांनी आदराने हात मंदिराकडे करून मला दर्शनाला आत जाण्याचा इशारा केला. तेव्हा मला पुष्कळ आनंद झाला. मी तेथून थेट गाभार्यात देवीच्या मूर्तीजवळ गेलो. देवीची मूर्ती पाहून आणि तिच्या चरणांना स्पर्श करून माझी भावजागृती झाली. तेथील एका पुजार्यांनी मला प्रसाद दिला. मी दर्शन घेऊन बाहेर आलो. मला विश्वासच बसत नव्हता. ‘योगतज्ञ दादाजींनीच क्षणभर त्या पोलिसांच्या बुद्धीत परिवर्तन केले असावे आणि त्यांना मला आत दर्शनासाठी सोडण्याची बुद्धी झाली असावी. माझ्या लक्षात आले, ‘ही सर्व योगतज्ञ दादाजींची कृपा आहे.’
४. पशुपतिनाथ मंदिरात ‘सत्पुरुषांच्या माध्यमातून योगतज्ञ दादाजी भेटले’, असे जाणवणे
४ अ. स्वप्नात एका मोठ्या मंदिराच्या परिसरात गणपतीचे मंदिर दिसणे आणि त्या मंदिराजवळ एक तेजस्वी सत्पुरुष दिसणे : १०.१०.२०२२ या दिवशी आम्ही मनोकामनादेवीचे दर्शन घेऊन रात्री उशिरा काठमांडू येथे मुक्कामाच्या ठिकाणी पोचलो. ११.१०.२०२२ या दिवशी मला पहाटे स्वप्न पडले. मला स्वप्नात दिसले, ‘एक मोठे मंदिर आहे. त्या मंदिराच्या परिसरात एक लहान गणपतीचे मंदिर आहे. त्या मंदिरात एक पुजारी होते. मी गणपतीच्या मूर्तीला नमस्कार केला आणि त्या पुजार्यांनाही नमस्कार केला. त्या पुजार्यांनीही मला नमस्कार केला. त्या मंदिराच्या जवळच एक तेजस्वी सत्पुरुष बसले आहेत. त्यांचे माझ्याकडे नकळत लक्ष आहे.’ त्यानंतर मला जाग आली.
४ आ. सकाळी पशुपतिनाथ मंदिरात गेल्यावर तेथे स्वप्नात दिसल्याप्रमाणे मोठे मंदिर दिसणे आणि प्रत्यक्ष मंदिरात गेल्यावर ‘शिवावर अभिषेक होत असतांना ‘प्रत्यक्ष भगवान शिव बसला आहे आणि त्याच्यावर पंचामृताचा अभिषेक होत आहे’, असे जाणवणे : मला जाग आल्यानंतर घड्याळात पाहिले, तर पहाटेचे ५ वाजले होते. मला ताजेतवाने वाटत होते. माझी झोप अल्प वेळ होऊनही प्रवासाचा थकवा जाणवत नव्हता. त्या दिवशी मंगळवार होता आणि ‘मला स्वप्नात गणपतीचे दर्शन झाले’, याचे विशेष वाटले. मी वैयक्तिक आवरून सिद्ध झालो. मी निवासस्थानाच्या बाहेर येऊन एका व्यक्तीला विचारले, ‘‘पशुपतिनाथ मंदिर किती दूर आहे ?’’ त्या व्यक्तीने सांगितले, ‘‘समोरच आहे. रस्ता ओलांडला की, समोर मंदिराचा परिसर चालू होतो.’’ अजून उजाडले नव्हते. मी मंदिराच्या दिशेने जाण्यास निघालो. मला मंदिराचा रस्ता ठाऊक असल्याप्रमाणे मी मंदिराच्या दिशेने चालत होतो. ते मंदिर पुष्कळ मोठे आहे. मी तेथे गेल्यावर मला दिसले, ‘तेथील शिवपिंडीवर अभिषेक चालू आहे.’ त्या वेळी ‘प्रत्यक्ष भगवान शिव बसला आहे आणि त्याच्यावर पंचामृताचा अभिषेक होत आहे’, असे मला जाणवले. तेव्हा माझी भावजागृती झाली.
४ इ. स्वप्नात दिसल्याप्रमाणे सत्पुरुष दिसणे आणि त्यांनी आशीर्वाद देणे : त्यानंतर मी मंदिराच्या आवारातच असलेल्या एका लहानशा मंदिराच्या कठड्यावर बसून नामजप करत आणि योगतज्ञ दादाजींनी दिलेला मंत्र म्हणत होतो. थोड्या वेळाने माझे लक्ष जवळच एका कठड्यावर बसलेल्या साधूकडे गेले. ते उंच आणि सडपातळ बांध्याचे होते. त्यांच्या चेहर्यावर तेज जाणवत होते. त्यांनी भगवी वस्त्रे परिधान केली होती. ते मांडी घालून बसले होते. ते अधून मधून माझ्याकडे पहात होते. मी त्यांच्याकडे आकर्षिला गेलो. तेव्हा त्यांनी मला हिंदीतून ‘‘माझे नाव आणि कुठून आला ?’’, असे विचारले. त्याविषयी मी त्यांना सांगितले. त्यांनी माझ्या डोक्यावर त्यांचा उजवा हात ठेवून आशीर्वाद दिला. त्या वेळी ते काहीतरी मंत्र पुटपुटले. तेव्हा मला पुष्कळ चांगली स्पंदने जाणवली. ते म्हणाले, ‘‘मी हिमाचल प्रदेशमधून आलो आहे.’’ हे सर्व घडत असतांना मला माझे अस्तित्व जाणवत नव्हते. ते सत्पुरुष बसले होते, तेथे बाजूलाच लहानसे गणपति मंदिर आणि त्यासमोर एक पुजारी होते. मी स्वप्नात जसे पाहिले, तसेच मला प्रत्यक्षात दिसले. ‘सध्या योगतज्ञ दादाजी मला स्वप्नदृष्टांताच्या माध्यमातून शिकवत आहेत’, असे मला जाणवते.
४ ई. ‘सत्पुरुषांच्या माध्यमातून योगतज्ञ दादाजींनी स्थुलातून दर्शन दिले’, असे जाणवणे : मी मंदिरातून बाहेर पडल्यानंतर वाहनात बसल्यावर मला त्या सत्पुरुषांच्या बोलण्याची आठवण झाली. ते मला म्हणाले होते, ‘‘मी हिमाचल प्रदेशमधून आलो आहे.’’ ‘मी त्यांना त्यांचे नाव विचारायला हवे होते’, हेही माझ्या लक्षात आले नाही. त्यांचे बोलणे आठवल्यानंतर माझी भावजागृती झाली आणि ‘त्यांच्या माध्यमातून योगतज्ञ दादाजींनीच मला स्थुलातून दर्शन दिले असावे’, असे मला वाटले. योगतज्ञ दादाजी यांचे गुरुबंधु आणि शिष्य परिवार हिमाचल प्रदेशातील दुर्गम भागात साधनारत आहेत.
५. आध्यात्मिक प्रवासाचे नियोजन दैवी असल्याचे लक्षात येणे
‘माझ्या या आध्यात्मिक प्रवासाचे नियोजन दैवी होते’, असे माझ्या लक्षात आले. हा प्रवास कोणताही त्रास न होता सहजतेने झाला. योगतज्ञ दादाजींचे माझ्याकडे स्थुलातून आणि सूक्ष्मातून बारकाईने लक्ष असायचे. ‘आता त्यांच्या देहत्यागानंतरही त्यांचे माझ्याकडे सूक्ष्मातून लक्ष आहे’, असे मला जाणवते.
६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘गुरुतत्त्व एकच आहे’, असे सांगणे
मला आतापर्यंत ३ वेळा स्वप्नात प्रथम परात्पर गुरु डॉ. आठवले दिसले आणि त्यांच्या जागी थोड्या वेळाने प.पू. दादाजी दिसले. तेव्हा माझ्या लक्षात येत नव्हते, ‘हे योगतज्ञ दादाजी आहेत कि परात्पर गुरु डॉक्टर !’ या स्वप्नांतून मला निश्चिती झाली की, ‘ते दोघे एकच आहेत.’ याविषयी परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘गुरुतत्त्व एकच आहे.’’
– श्री. अतुल पवार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.४.२०२३)
गुरुसेवा हीच ईश्वरसेवा, गुरूंची उपासना हीच ईश्वराची उपासना आणि गुरूंची पूजा हीच ईश्वराची पूजा होय ! – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन
१. गुरु आत्मोपदेश देऊन शिष्याचा आत्मोद्धार करतात !
‘गुरु ईश्वरस्वरूप असल्याने शिष्यासाठी गुरु हीच श्रद्धा, गुरु हीच उपासना आणि गुरु हीच सेवा आहे. शिष्याने अखंडपणे काया, वाचा आणि मनाने गुरुभक्ती करावी; कारण गुरु आत्मोपदेश देऊन शिष्याचा आत्मोद्धार करतात.
२. आत्मज्ञान प्रदान करून जिवाचा उद्धार करणार्या गुरुसेवेहून अन्य कोणतेही श्रेष्ठ तप नाही !
शिष्यासाठी गुरु हेच सर्वश्रेष्ठ आहेत. गुरूंच्या सगुण रूपातच ईश्वर वास करत असतो. गुरु जिज्ञासूच्या जीवनातील अंधकार नष्ट करून त्याला आत्मज्ञान प्रदान करतात. आत्मज्ञान प्रदान करून जिवाचा उद्धार करणार्या गुरुसेवेहून अन्य कोणतेही श्रेष्ठ तप नाही.
३. ईश्वराचा शोध घेण्यापेक्षा गुरु शोधावा !
भक्ताच्या भक्तीने प्रसन्न झालेला ईश्वर भक्ताला गुरूंकडे पाठवतो; म्हणून गुरुचरणांचा आश्रय घ्यावा. स्वतः परिपूर्ण ईश्वर असलेल्या श्रीकृष्णानेही सांदिपनी ऋषींना शरण जाऊन त्यांची सेवा आणि उपासना केली. परमश्रेष्ठ गुरुस्थानी असणार्या महात्म्यांचा संग आणि सहवास अत्यंत दुर्लभ, अनाकलनीय अन् निश्चितपणे फलदायी असतो. यासाठी ईश्वराचा शोध घेण्यापेक्षा गुरु शोधावा.
४. गुरुसेवा हीच ईश्वरसेवा !
गुरु लाभल्यास शिष्याने संपूर्णपणे गुरुचरणी समर्पण होऊन त्यांची एकनिष्ठपणे सेवा करावी. गुरुसेवा हीच ईश्वरसेवा होय. गुरूंची उपासना हीच ईश्वराची उपासना. गुरूंची पूजा हीच ईश्वराची पूजा होय.’
– योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन
योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांनी कठीण प्रसंगांतून वाचवल्याबद्दल साधकाने त्यांना लिहिलेले कृतज्ञतापत्र !
प.पू. दादाजीस,
आम्हा उभयतांचा साष्टांग नमस्कार !
२० आणि २१.५.१९९३ या दिवशी आम्हा सर्वांना आपली पुष्कळ आठवण झाली. एक वर्षापूर्वी आपण प्रथम नगरला (आताच्या अहिल्यानगरला) आला होता. त्या दिवसापासून आपल्या कृपेची पाखरण आम्हाला मिळाली. त्या संदर्भाने आम्ही जेव्हा बोलतो, तेव्हा ‘आज आम्ही आहोत, ते केवळ आपल्या कृपेमुळे’, ही जाणीव मनोमन होते. जे काही वाटते, ते केवळ शब्दांनी व्यक्त करणे अशक्य आहे.
‘आपण केलेली कारवाई (अनुष्ठान), दिलेला धीर, वाढवलेले मानसिक बळ आणि आचरण करण्यासंबंधी दिलेल्या सूचना’, यांमुळेच आम्ही कठीण प्रसंगांतून वाचलो. मला तर आपण पुनर्जीवन दिले. आपण आम्हाला वाचवले. त्यामुळे कृतज्ञतेने मन भरून येते; म्हणून आजही आमचे नातेवाईक ‘दादाजींच्या कृपेने वाचलात !’, असे बोलतात. यापुढील आयुष्यात ज्या ज्या चांगल्या गोष्टी आणि चांगली कार्ये हातून घडतील, त्यांचे संपूर्ण श्रेय आपल्यालाच असेल. त्यासाठी आपले शुभाशीर्वाद असावेत.
आपण सांगितल्याप्रमाणे नियम चालू आहेत. जपाचे प्रमाण प्रतिदिन १ सहस्रपर्यंत वाढवले आहे. नियमांचे बर्यापैकी पालन होते; पण पूर्वीसारखे श्रद्धेने होत नाहीत. आलेल्या (वाईट) अनुभवामुळे श्रद्धा न्यून झाली असावी. तथापि ‘जे काही चांगले होणार आहे, ते आपल्यामुळे होणार आहे’, असा विश्वास आहे. या आशेवर ती श्रद्धा आणि भक्ती यांची वाट पहात रहाणार आहे.
आपला कृपाभिलाषी,
– श्री. सुभाष मांडके, अहिल्यानगर, महाराष्ट्र. (२५.३.१९९३)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |