अल्पवयीन मुलाचे वडील असलेले बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्यासह ५ जणांना अटक !
पुणे येथील भीषण अपघाताचे प्रकरण
आरोपी मुलावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद !
पुणे – कल्याणीनगर भागात एका अल्पवयीन मुलाने मद्य प्राशन करून महागाडी चारचाकी गाडी अत्यंत भरधाव वेगाने चालवत दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेमध्ये दुचाकीववरी २४ वर्षीय युवक आणि युवती या दोघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर शहरातील राजकीय पक्ष आणि सामाजिक संस्था आक्रमक होत त्यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. अल्पवयीन मुलाचे वडील असलेले बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांना छत्रपती संभाजीनगर येथून पोलिसांनी अटक केली आहे. यासह अल्पवयीन मुलाला मद्य दिल्याप्रकरणी ‘कोझी रेस्टॉरंट’चे २ कर्मचारी, मालक प्रल्हाद भुतडा आणि व्यवस्थापक सचिन काटकर, तसेच ‘हॉटेल ब्लॅक’चे मालक संदीप सांगळे यांनाही २१ मे या दिवशी अटक करण्यात आली. मुलगा मद्यप्राशन करून गाडी चालवत असल्याचे सी.सी. टी.व्ही. चित्रीकरणातून स्पष्ट झाले आहे. त्याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला १४ दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली. या प्रकरणात स्थानिक आमदार सुनील टिंगरे यांचे नाव जोडले जात आहे. त्यांनी पोलिसांवर दबाव आणल्याचीही चर्चा आहे; परंतु या चर्चांवर सुनील टिंगरे यांनी मौन सोडले असून त्यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत.
मुख्यमंत्री शिंदे यांचा आयुक्तांना दूरभाष !
या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना दूरभाष करून ‘या प्रकरणात कुणालाही पाठीशी न घालता किंवा राजकीय दबावाला बळी न पडता कठोर कारवाई करा’, असा आदेश दिला आहे.
अल्पवयीन मुलाने कबुलीजबाबात काय म्हटले ?
या प्रकरणामध्ये आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलाने स्वत:चा जबाब नोंदवला आहे. यात म्हटले आहे की, ‘मी कार चालवण्याचे रीतसर प्रशिक्षण घेतलेले नाही. माझ्याकडे वाहन चालवण्याचा परवानाही नाही. तरीही माझ्या वडिलांनीच त्यांच्या मालकीची ग्रे (करड्या) रंगाची पोर्शे कार माझ्याकडे दिली. त्यांनीच मला मित्रांसह हॉटेलमध्ये पार्टी करण्याची अनुमती दिली. मी मद्यप्राशन करतो, हे वडिलांना माहिती आहे.’
अपघातातील पोर्शे कार विनानोंदणी !
अल्पवयीन मुलाने चालवलेली सदर कार केवळ विनाक्रमांकच नव्हती, तर ही कार विनानोंदणीच (विनारजिस्ट्रेशन) रस्त्यावर धावत असल्याची माहिती समोर आली आहे. या कारची किंमत अनुमाने २ कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. बेंगळुरूमध्ये तात्पुरती नोंदणी करून ही कार पुण्यात आणण्यात आली होती. या प्रकारामुळे आता पुणे पोलिसांवरही प्रश्न उपस्थित केले जात आहे.
पोलिसांनी आरोपी मुलासाठी पोलीस ठाण्यातच मागवला पिझ्झा आणि बर्गर !पोलिसांकडून विशाल अग्रवाल यांच्या मुलाला विशेष वागणूक देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. कारचालक मुलगा आणि त्याचे मित्र यांना येरवडा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्या वेळी त्याच्या कुटुंबियांनी वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या अनुमतीने मुलांसाठी बाहेरून पिझ्झा आणि बर्गर मागवला होता. एका पोलिसाने हे खाद्यपदार्थ मागच्या बाजूने पोलीस ठाण्यात नेल्याचे समजते. |
शिक्षा म्हणून अपघातावर ३०० शब्दांचा निबंध लिही ! – न्यायालयाची आरोपी मुलाला ‘शिक्षा’अल्पवयीन मुलगा असल्याने पोलिसांनी त्याच्या विरोधात जामीनपात्र कलमे लावली आहेत. त्यामुळे त्याला त्वरित जामीन मिळाला. शिक्षा म्हणून ‘आरोपी गाडी चालकाने १५ दिवस ‘ट्रॅफीक’ हवालदारासमवेत चौकात उभे राहून वाहतुकीचे नियमन करावे, मद्य सोडवण्यासाठी मानसोपचार तज्ञांकडून उपचार घ्यावेत, अपघातावर ३०० शब्दांचा निबंध लिहावा, भविष्यात कुणाचा अपघात झाल्याचे निदर्शनास आल्यास साहाय्य करावे, अशी शिक्षा न्यायालयाने त्याला जामीन देतांना दिली आहे. |
‘बाल न्याय मंडळा’चा निकाल धक्कादायक ! – गृहमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे – येथील अपघाताच्या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी २१ मे या दिवशी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. पोलिसांनी सर्व घटनेचे पुरावे बाल न्याय मंडळाला दिले; पण तरीही बाल न्याय मंडळाने दिलेला निकाल हा पोलिसांसाठी धक्कादायक होता, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुळातच ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी ‘बाल न्याय मंडळा’कडे दिलेल्या अहवालात कलम ३०४ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. आरोपी मुलगा हा १७ वर्षे ८ महिन्यांचा असल्याने ‘बाल न्याय मंडळा’ने आरोपीला जामीन संमत केला; मात्र निर्भया हत्याकांडानंतर ‘बाल हक्क मंडळा’मध्ये जे पालट करण्यात आले आहेत, त्यांनुसार १६ वर्षांपेक्षा अधिक वयाचा मुलगा असल्यास त्यास ‘प्रौढ’ म्हणून वागणूक दिली पाहिजे. त्यानुसार पोलिसांनी ‘बाल हक्क मंडळा’पुढे तसा अहवालही दिला होता; मात्र मंडळाने तो आदेश बाजूला ठेवल्याने आरोपीला जामीन मिळाल्याचे गृहमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, न्यायालयाचा निर्णय, हा पोलिसांसाठीही धक्का होता; कारण पोलिसांनी या प्रकरणात सगळे पुरावे दिले आहेत. तात्काळ वरच्या न्यायालयात अर्जही प्रविष्ट करण्यात आला आहे; मात्र वरच्या न्यायालयाने पोलिसांना प्रथम ‘बाल हक्क मंडळा’कडे जाण्यास सांगितले. त्यामुळे आम्ही पुन्हा अर्ज प्रविष्ट करणार आहोत. जर बाल न्याय मंडळाने गंभीर गुन्हा समजून आदेश दिला नाही, तर पोलीस वरच्या न्यायालयात जातील.