राज्याचा १२ वीचा निकाल ९३.३७ टक्के, कोकणाचा निकाल सर्वाधिक !

मुंबई – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने वर्ष २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाचा १२ वीच्या परीक्षेचा निकल घोषित केला आहे. राज्याचा १२ वीचा निकाल ९३.३७ टक्के इतका लागला असून यामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक, म्हणजे ९७.५१ टक्के इतका आहे, तर मुंबईचा निकाल सर्वांत अल्प ९१.९५ टक्के इतका लागला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत घेऊन निकालाची घोषणा केली.

या वर्षी २१ फेब्रुवारी ते २३ मार्च या कालावधीत मराठी, हिंदी, उर्दु, इंग्रजी, गुजराती आणि कन्नड या ६ भाषांमध्ये १२ वीची परीक्षा घेण्यात आली होती. राज्यातील एकूण १५ लाख ९ सहस्र ८४८ विद्यार्थ्यांनी १२ वीची परीक्षा दिली. प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही मुलांपेक्षा मुलींच्या निकालाची टक्केवारी अधिक आहे. विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९२.६०, तर विद्यार्थीनींचे ९५.४९ टक्के आहे.

निकालाविषयी अधिक माहिती देतांना शरद गोसावी म्हणाले, ‘‘१२ वीची ६ माध्यमांतील १५४ विषयांची परीक्षा घेण्यात आली. अंतर्गत परीक्षा ऑनलाईन घेतल्यामुळे निकाल लवकर घोषित करता आला. परीक्षेच्या वेळी अपप्रकार रोखण्यासाठी राज्यस्तरावर २७१ भरारी पथके नेमण्यात आली होती, तसेच जिल्हा स्तरावर स्वतंत्र भरारी पथके नियुक्त करण्यात आली होती.