आम्ही कुणालाही भारताची हानी करू देणार नाही ! – श्रीलंका

श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री अली साबरी

कोलंबो (श्रीलंका) – आम्हाला सर्व देशांसमवेत काम करायचे आहे; परंतु त्यासाठी आम्ही इतर कोणत्याही देशाची सुरक्षा पणाला लावणार नाही. जर भारताने  सुरक्षेविषयी प्रश्‍न उपस्थित केले, तर आम्ही त्याकडे निश्‍चितच लक्ष देऊ. आमचा देश भारताच्या सुरक्षेसाठी वचनबद्ध आहे. एक उत्तरदायी शेजारी म्हणून आम्ही कुणालाही भारताची हानी करू देणार नाही, अशा शब्दांत श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री अली साबरी यांनी चीनकडून भारताच्या सुरक्षेला धोका असल्याच्या पार्श्‍वभूमीवर श्रीलंकेची भूमिका स्पष्ट केली. ए.एन्.आय. या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. श्रीलंकेच्या बंदरांवर चीनची हेरगिरी करणारी नौका थांबण्यासाठी देण्यात आलेल्या अनुमतीवरील प्रश्‍नावर ते बोलत होते. भारताने या संदर्भात श्रीलंकेकडे आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर श्रीलंकेने सप्टेंबर २०२३ मध्ये चीनच्या नौकांना त्यांच्या देशाच्या बंदरावर थांबवण्याची अनुमती नाकारली होती.

साबरी पुढे म्हणाले की, अलीकडेच चीन भारताचा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार म्हणून उदयास आला आहे. त्याचप्रमाणे श्रीलंकेलाही भारतासमवेत एकत्र काम करायचे आहे; परंतु आम्ही तिसर्‍या पक्षाला कधीही धोक्यात घालणार नाही.

‘ब्रिक्स’ संघटनेत सहभागी होण्याची व्यक्त केली इच्छा !

परराष्ट्रमंत्री साबरी म्हणाले की, भारत ‘ब्रिक्स’ संघटनेत सहभागी झाल्यानंतर ही एक अतिशय चांगली संघटना बनली आहे. आम्हीही या संघटनेत सहभागी होण्यासाठी प्रयत्न करू. ब्रिक्स देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीसाठी आम्हालाही आमंत्रित करण्यात आले आहे.