शेतमाल चोरणार्‍यांवर कारवाई करा ! – शेतकरी संघटनेची पोलीस महानिरीक्षकांकडे मागणी

प्रतिकात्मक चित्र

सातारा, २० मे (वार्ता.) – राज्यात प्रचंड दुष्काळ आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. शेतीमालाला भाव नाही. अनंत अडचणींचा सामना करून कर्ज काढून शेतकरी शेतीमाल पिकवतात. या शेतमालावर डल्ला मारणारे चोर रात्री शेतीमाल चोरून नेत आहेत. या चोरीच्या घटना थांबाव्यात, अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने कोल्हापूरच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनामध्ये म्हटले आहे, शेतकरी हंगामी फळे आणि भाजीपाला, टोमॅटो, काकडी, कलिंगड, टरबूज आदी फळांचीही उत्पादने घेत आहेत. ही उत्पादनेच जर चोरीला गेली, तर शेतकर्‍यांमध्ये निराशा येऊन त्यांच्यापुढे आत्महत्येविना दुसरा पर्याय उरत नाही. श्रीक्षेत्र खंडोबाची पाली येथील शेतकरी रवींद्र शामराव पाटील यांच्या शेतातील कलिंगडे चोरीला गेली आहेत. शेतमाल चोरीला गेला, तर शेतकरी कर्ज कसे फेडणार ? कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवणार ? फळबागांसाठी खर्च केलेला पैसा पुन्हा कसा मिळवणार ? अशा अनेक अडचणी शेतकर्‍यांसमारे निर्माण झाल्या आहेत. यावर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संशयितांना अटक करावी, तसेच संशयितांना साहाय्य करणार्‍यांवरही कडक कारवाई करावी.