नवीन वर्षापासून संगणकीयकृत प्रणालीद्वारे घरपट्टीची देयके ! – शुभम गुप्ता, आयुक्त, सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका
यापुढील आमचा प्रवास हा ‘कॅशलेस’ आणि ‘पेपरलेस’ असेल !
सांगली, २१ मे (वार्ता.) – सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात नवीन वर्षांपासून संगणकीयकृत प्रणालीद्वारे घरपट्टीची देयके देण्यात येणार आहेत. जे ग्राहक जूनमध्ये देयक भरतील त्यांना मालमत्ता करात १० टक्के सवलत, तर जे ग्राहक जुलैअखेर मालमत्ता कर भरतील त्यांना करात ५ टक्के सूट देण्यात येणार आहे. यंदाच्या वर्षअखेरपर्यंत नागरिकांसाठी आम्ही मालमत्ता कर, पाणीपट्टी यांपासून सर्वच करांची देयके मुद्रीत देयकांऐवजी ‘ऑनलाईन’ पद्धतीने भरण्याची सोय उपलब्ध करून देत आहोत. यापुढील आमचा प्रवास हा ‘कॅशलेस’ आणि ‘पेपरलेस’ असेल, अशी माहिती सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी २१ मे या दिवशी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी उपायुक्त शिल्पा दरेकर उपस्थित होत्या.
१. यंदाच्या वेळेपासून मालमत्ता कर गोळा करणार्या करनिरीक्षकांना आम्ही संगणकीकृत यंत्र उपलब्ध करून देणार आहोत, ज्याद्वारे ते कुठेही हा कर घेऊ शकतील. या यंत्राद्वारे नागरिकांना तात्पुरती पावती मिळेल. ज्यांना याची मुद्रीत प्रत हवी असेल, ते जवळच्या सेवा केंद्रातून घेऊ शकतात. जे ग्राहक संगणकीय प्रणालीद्वारे मालमत्ता कराची पावती घेतील आणि ‘ऑनलाईन’ प्रणालीद्वारे मालमत्ता कर भरतील त्यांना आम्ही विशेष सवलत उपलब्ध करून देणार आहोत. यापुढील आमचा प्रवास हा ‘कॅशलेस’ आणि ‘पेपरलेस’ असण्याकडे असेल. जे ग्राहक ‘ऑनलाईन’ पद्धतीने कर भरतील त्यांना कर भरल्यावर तात्काळ भ्रमणभाषवर संदेश प्राप्त होईल. ही प्रणाली नागरिकांना कर भरण्यासाठी आठवणही करून देईल.
२. प्रत्येक ५ वर्षांनी नवीन मालमत्ताकरांची पडताळणी होणे अपेक्षित असते; मात्र वर्ष २००९-२०१० नंतर ती झाली नाही. ही पडताळणी यंदा चालू करण्यात आली आहे. साधारणत: सप्टेंबरपर्यंत मोजणी, नोंदणी, त्यावर आक्षेप-सुनावणी हे सर्व पूर्ण होईल. ही मोजणी करतांना जर कुणी अनधिकृत बांधकाम केल्याच निदर्शनास आले, तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल आणि नियमबाह्य असल्यास ते पाडण्यात येईल.
३. आता आपल्याकडे १ लाख ५१ सहस्त्र नोंदणीकृत मालमत्ताधारक आहेत. मोजणी पूर्ण झाल्यावर यात निश्चित भर पडेल, अशी आम्हाला आशा आहे. यंदाची असलेली वसुली ही ६० टक्क्यांपेक्षा अधिक असेल.
४. सांगली महापालिकेतील मालमत्ताकर हा अन्य महापालिकांच्या तुलनेत अल्प असून यंदाच्या वर्षी कोणतीही करवाढ मालमत्ताकरात केलेली नाही. सर्वेक्षण करतांना ते आम्ही अत्याधुनिक पद्धतीने केले असून यात ‘ड्रोन’चा वापर, प्रत्यक्ष घरातील बांधकामाचे ‘ड्राईंग’, तसेच अन्य गोष्टी यांचा समावेश आहे. यावर ज्यांचा आक्षेप असेल त्यांच्यासमोर नकाशा ठेवून आम्ही सुनावणी घेऊ.
महापालिका क्षेत्रातील ‘कॅफें’ची पडताळणी चालू ! – आयुक्त
महापालिका क्षेत्रात असलेल्या ‘कॅफें’ची पडताळणी चालू आहे. यात त्यांना ज्या कारणासाठी परवाना दिला गेला, त्यासाठी ते वापरण्यात येत आहे का ? त्यांचा बांधकाम परवाना आणि त्यासंदर्भात त्यांनी केलेले बांधकाम, तसेच अन्य गोष्टी पडताळून पहाण्यात येत आहेत. |