पिंपरी-चिंचवड (पुणे) शहरातील वाहनधारकांना नियमांचे उल्लंघन न करता आली दंडाची पावती !

ऑनलाईनच्या माध्यमांतून तक्रारींमध्ये वाढ

 पिंपरी (पुणे) – वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनचालकांवर सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवण्यात येते. त्याआधारे दंड आकारला जातो; मात्र वाहतूक नियमांचे उल्लंघन न करणार्‍या वाहनधारकांना चुकीच्या पद्धतीने दंडाचा संदेश येत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ होत आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या वर्षामध्ये ६ सहस्र ६७४ जणांनी तक्रार नोंद केली आहे. चालू वर्षातील जानेवारी ते एप्रिल या महिन्यांमध्ये १ सहस्र ८४८ वाहनधारकांनी दंडाचे चलन (पावती) चुकीचे आले म्हणून विरोधात तक्रारी केल्या आहेत.

वाहतुकीचे नियम न मोडता आलेल्या ई-चलनाच्या संदेशामुळे वाहनचालकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. वाहन क्रमांकावरील चुकीच्या, अर्धवट किंवा पालट (वाहनांवर क्रमांक बनावट टाकणे) केलेल्या क्रमांकामुळे चुकीचे ई-चलन पाठवले जात असल्याचे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे. चालू वर्षामध्ये आलेल्या सर्व तक्रारींचे निरसन केले आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड म्हणाले, ‘‘वाहतूक विभागाकडून चुकीचे चलन आले असल्यास त्याची पडताळणी करून ते रहित करता येते. चुकीच्या चलनाविषयी ‘महाट्रॅफिक’ किंवा ‘वाहतूक शाखेच्या नियंत्रण कक्षा’कडे तक्रार नोंदवावी लागते. आपल्याकडे असलेल्या पुराव्यांच्या आधारे चलन रहित करता येते.’’

संपादकीय भूमिका :

नियमांचे उल्लंघन न करता दंडाची पावती कशी येते ? असे झाले तर लोकांचा नवीन तंत्रज्ञानावर कसा विश्वास बसेल ? यंत्रणेमध्ये त्रुटी असतील, तर त्या अगोदरच का शोधल्या नाहीत ?