मूळव्याधीचे आधुनिक वैद्य ढाकरे करायचे अवैधरित्या गर्भपात !
सिल्लोड (छत्रपती संभाजीनगर) येथील अवैध गर्भपाताचे प्रकरण
विनाअनुमती ३ वर्षे चालू होते सिल्लोड येथील श्री रुग्णालय !
छत्रपती संभाजीनगर – जिल्ह्यातील सिल्लोड शहरात अवैध गर्भलिंगनिदानामुळे चर्चेत आलेले ‘श्री रुग्णालय’ मागील ३ वर्षांपासून चालू होते. या रुग्णालयाला जिल्हा शल्यचिकित्सक (सिव्हिल सर्जन) कार्यालयाची अनुमतीच नव्हती. तरीही ३ वर्षे रुग्णालयामध्ये अवैध प्रकार चालू होते. या रुग्णालयाच्या उद्घाटनाला सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयाच्या तत्कालीन वैद्यकीय अधीक्षकांसह अनेक मान्यवरही उपस्थित होते. विशेष म्हणजे याविषयी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दयानंद मोतीपवळे यांना विचारले असता त्यांनी हात झटकले.
गारखेडा परिसरातील पॉलिटेक्निकची विद्यार्थिनी साक्षी थोरात आणि तिची आई सविता थोरात या चालवत असलेल्या अवैध गर्भलिंगनिदान केंद्राचा भांडाफोड झाल्यानंतर पोलिसांनी सिल्लोड येथील श्री रुग्णालयावर धाड घातली. त्यात आधुनिक वैद्यासह ३ जणांना अटक केली. रुग्णालयाचा संचालक डॉ. रोशन ढाकरे (वय ३१ वर्षे) हा बी.ए.एम्.एस्. असून मूळव्याधीवर उपचार करण्याचे त्यांचे प्रावीण्य आहे; मात्र त्याने काही वर्षांपासून अवैधरीत्या गर्भपात करण्याचा सपाटा लावला होता.
तसेच डॉ. रोशन ढाकरे याने मुख्य रस्त्यावर ७ ऑक्टोबर २०२१ या दिवशी अनेक मान्यवर, राजकीय नेते आणि नामांकित आधुनिक वैद्य यांच्या उपस्थितीत श्री रुग्णालयाचे उद्घाटन केले होते. रुग्णालयाच्या उद्घाटन पत्रिकेवर प्रमुख पाहुणे म्हणून सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित सरदेसाई, वैद्यकीय अधिकारी डॉ. बी.एन्. मोरे, डॉ. ए.आर्. गायकवाड यांच्यासह इतर मान्यवरांची नावे होती.
२ संशयितांना सिल्लोड येथे आणणार !
‘आम्ही अन्वेषणाच्या दृष्टीने सिल्लोड आणि परिसरात या प्रकरणातील २ संशयितांना आणणार आहोत. त्यात आणखी काही गोष्टी उघड होण्याची शक्यता आहे’, असे अन्वेषण अधिकारी पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांनी सांगितले.
श्री रुग्णालयाला अनुमती नसल्याविषयी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दयानंद मोतीपवळे यांच्याशी संपर्क साधला. त्या वेळी त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. ‘या संदर्भात सिल्लोड येथील वैद्यकीय अधीक्षकांना विचारणा करून सांगतो’, असे उत्तर त्यांनी दिले. विशेष म्हणजे वर्ष २०२१ मध्ये डॉ. मोतीपवळे हेच जिल्हा शल्यचिकित्सक होते.