सनातन धर्म युक्तीने आणि शास्त्रयुक्त मांडून लोकांना धर्मनिष्ठ बनवणारे धर्मसंस्थापक ! – भारताचार्य प्रा. सु.ग. शेवडे
१. धर्म म्हणजे काय ?
१ अ. प्रजेला धारण करतो, तो धर्म ! : ‘धारणाद्धर्म इत्याहुर्धर्मेण विधृताः प्रजाः ।’ (महाभारत, शान्तिपर्व, अध्याय ११०, श्लोक ११) म्हणजे ‘जो धारण करतो, त्याला धर्म म्हणतात. धर्म प्रजेला धारण करतो, म्हणजे तिचे रक्षण करतो.’
१ आ. उत्पन्न झालेल्या सर्वांच्या गुणधर्मांचा विश्वाच्या शाश्वत कल्याणासाठी उपयोग कसा करावा, हे सांगणारे ईश्वरी शास्त्र म्हणजे धर्म ! : ‘या सृष्टीतील सर्व पदार्थ, प्राणी, मानव इत्यादींच्या उत्पत्ती समवेत निश्चितपणे उत्पन्न झालेल्या त्यांच्या गुणधर्मांचा विश्वाच्या शाश्वत कल्याणासाठी उपयोग कसा करावा ?’, हे ठरवणारे ईश्वरी शास्त्र म्हणजे धर्म !
२. पंथ म्हणजे धर्म नव्हे !
३. धर्माची स्थापना परमेश्वरच करू शकतो !
अर्थात् संपूर्ण विश्वातील सर्व पदार्थांचे सर्व गुणधर्म जाणून त्यांच्या सर्व शक्तींचा जगाच्या निश्चित कल्याणार्थ उपयोग कसा करावा ? हे कुणा मानवाला कधी तरी कळू शकेल काय ? एखाद्याने शास्त्राच्या एखाद्या अंगात पारंगत होण्यास सारे जीवन घालवले, तरी त्यातील थोडेसेच पदरात पडते. हे जर खरे, तर जगातील सर्वच संभाव्य शास्त्रे एकच माणूस कशी जाणू शकेल ? हे जर एका माणसाला शक्य नाही, तर तो धर्म स्थापन कसा करू शकेल ? म्हणून धर्माची स्थापना परमेश्वरच करू शकतो.
४. मानवमात्रांच्या हृदयात धर्माची स्थापना करतात ते धर्मसंस्थापक !
धर्मस्थापनेचे नर । ते ईश्वराचे अवतार ।
जाले आहेत पुढें होणार । देणें ईश्वराचें ॥
– दासबोध, दशक १८, समास ६, ओवी २०
अर्थ : धर्माची स्थापना करणारे पुण्यपुरुष हे ईश्वराचेच अवतार असतात. आतापर्यंत असे अवतार झालेले आहेत, सांप्रतही आहेत आणि पुढेही होतच रहातील. असे पुरुष उत्पन्न होणे, हे ईश्वराचेच देणे आहे.
या ओवीचा अर्थ एक विद्वान सांगत होते, ‘जगात जे अनेक धर्म आहेत, त्या सर्व धर्मांचे संस्थापक हे ईश्वराचे अवतार आहेत, असे समर्थ रामदासस्वामी म्हणतात.’
या गृहस्थास रामदासस्वामींच्या म्हणण्याचा अर्थ कळलेलाच नाही. धर्मस्थापनेचे नर म्हणजे धर्मसंस्थापक (Founder of the religion) नव्हे. धर्म अनादी आणि ईश्वरी आहे. लोक धर्मापासून दुरावले आहेत. त्या लोकांसमोर सनातन धर्म युक्तीने आणि शास्त्राने मांडून त्यांना धर्मनिष्ठ बनवणारे ते धर्मस्थापनेचे नर. मानवमात्रांच्या हृदयात धर्माची स्थापना हे लोक करत असतात. ते धर्म उत्पन्न करत नाहीत. धर्म हा कुणाच्या लहरीने उत्पन्न होत नसतो, तो असतोच. केवळ तो लोकांपर्यंत पोचवायचे काम करायचे असते. हे काम जो करतो, तो धर्मसंस्थापक. या अर्थाने आदी शंकराचार्य, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, समर्थ रामदासस्वामी, इतकेच काय मीसुद्धा धर्मसंस्थापकच आहे !’
– शेवडेंची अमेरिकेतील प्रवचने (शिकागो, १९.८.१९८०)