Delhi High Court : देहली उच्च न्यायालयाने ५ आतंकवाद्यांची जन्मठेपेची शिक्षा अल्प करून १० वर्षे केली !

नवी देहली – देहली उच्च न्यायालयाने जैश-ए-महंमद या जिहादी आतंकवादी संघटनेच्या ५ ‘ओव्हर ग्राऊंड वर्कर’ (स्थानिक साहाय्यक) असणार्‍यांची जन्मठेपेची शिक्षा १० वर्षे केली आहे. न्यायालयाने म्हटले, ‘अनेक प्रकरणांमध्ये अडकूनही त्यांनी स्वत: कोणताही गुन्हा केलेला नाही.’ बिलाल अहमद मीर, सज्जाद अहमद खान, मुजफ्फर अहमद भट, मेहराज-उद-दीन चोपन आणि इश्फाक अहमद भट, अशी या आतंकवाद्यांची नावे आहेत. कनिष्ठ न्यायालयाने त्यांना वर्ष २०२२ मध्ये फाशीची शिक्षा सुनावली होती. २८ नोव्हेंबर २०२२ या दिवशी ती अल्प करून जन्मठेपेत परावर्तीत करण्यात आली. हे सर्व आतंकवादी जम्मू-काश्मीरमधील आहेत.

देहली उच्च न्यायालयाने सांगितले की, ज्या व्यक्तीला विवेक आहे, तो त्याचे पाप स्वीकारतो आणि भोगतो. आम्ही ‘गुन्हा आणि शिक्षा’ या पुस्तकाच्या लेखक फ्योदोर दोस्तोव्हस्कीच्या एका वाक्याचा संदर्भ घेतो. या पुस्तकात दोस्तोएव्स्कीने लिहिले आहे, ‘जर त्याच्याकडे विवेक असेल, तर त्याला त्याच्या चुकीचे दुःख भोगावे लागेल; हीच शिक्षा असेल, तसे तसेच कारावासही असेल.’ त्यांची शिक्षा अल्प केल्याने त्यांचे गुन्हे कमी होत नाहीत. ते अनेक प्रकरणांमध्ये गुंतलेले असतांनाही त्यांनी थेट कोणतेही काम केलेले नाही. अशा परिस्थितीत त्यांना सुधारण्यासाठी एक खिडकी उघडी ठेवायला हवी.