Hamas Israel Conflict : गाझामध्ये जे काही होत आहे, तो नरसंहार नाही ! – अमेरिका

अमेरिकेचे इस्रायलला पुन्हा समर्थन !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन

वॉशिंग्टन (अमेरिका) – हमास आणि इस्रायल यांमध्ये गेल्या ७ महिन्यांपासून युद्ध चालू आहे. यामध्ये आतापर्यंत ३० सहस्रांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिका कधी इस्रायलच्या समर्थनार्थ, तर कधी विरोधात बोलते. आता पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी इस्रायलला पाठिंबा दर्शवला आहे. त्यांनी ‘व्हाईट हाऊस’मध्ये ‘ज्यू अमेरिकन हेरिटेज मंथ’ (ज्यू अमेरिकी वारसा महिना) यानिमित्त एका समारंभाचे आयोजन केले होते. बायडेन म्हणाले की, गाझामध्ये जे काही होत आहे, तो ‘नरसंहार’ नाही.

या वेळी बायडेन यांनी इस्रायली नेत्यांविरुद्ध युद्ध गुन्ह्यांसाठी प्रसारित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाच्या विनंतीवरही टीका केली. हमासविरुद्धच्या युद्धात इस्रायलला पाठिंबा देण्याचे वचनही त्यांनी दिले.

‘ज्यू अमेरिकन हेरिटेज मंथ’ म्हणजे काय ?

‘ज्यू अमेरिकन हेरिटेज मंथ’ हा मे महिन्यामध्ये अमेरिकेतील अमेरिकी ज्यूंचे कर्तृत्व आणि योगदान यांची वार्षिक ओळख अन् उत्सव म्हणून साजरा केला जातो.