तलाठी परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांची अद्याप नियुक्ती नाही !

८ तलाठ्यांवर २३ कार्यालयांच्या कामकाजाचा अतिरिक्त भार !

पिंपरी – राज्य सरकारने घेतलेल्या तलाठी परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांची अद्याप नियुक्ती न झाल्याने शहरातील २३ कार्यालयांमध्ये तलाठ्यांची न्यूनता भासत आहे. पिंपरी-चिंचवड अपर तहसील कार्यालयांतर्गत केवळ ८ तलाठी कार्यरत आहेत. त्यांच्यावर २३ कार्यालयांच्या कामकाजाचा अतिरिक्त भार पडल्याने नागरिकांची कामे रखडत आहेत.

उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला यांसह अनेक दाखले काढण्यासाठी तलाठी कार्यालयात नागरिकांना यावे लागते; मात्र अपर तहसील कार्यालयांतर्गत तलाठ्यांची संख्या अपुरी आहे. तलाठ्यांच्या रिक्त असलेल्या पदांसंदर्भातील अहवाल अपर तहसील कार्यालयातून प्रत्येक महिन्याला पाठवला जात असल्याचे अधिकारी सांगतात; मात्र शासनस्तरावर त्या संदर्भात सकारात्मक निर्णय होत नाही. राज्य सरकारने नुकतीच तलाठ्यांच्या ८ सहस्र पदांसाठी परीक्षा घेतली होती; मात्र उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची अद्याप नियुक्ती झाली नाही. सद्यःस्थितीत ८ तलाठी कार्यरत असून त्यांच्याकडे इतर कार्यालयाचे कामकाज दिल्याचे पिंपरी-चिंचवड अपर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार प्रवीण ढमाले यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

उत्तीर्ण उमेदवारांची नियुक्ती आतापर्यंत का झाली नाही ? ८ तलाठ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण आल्यामुळे आणि नागरिकांच्या कामामध्ये विलंब झाल्यामुळे त्यांना झालेल्या मनस्तापाची भरपाई कोण देणार ?