‘गोवा शिपयार्ड’मध्ये काम करणार्या व्यक्तीने भारतीय नौसेनेची गोपनीय माहिती पाकिस्तानी दलालाला पाठवली !
|
(हनी ट्रॅप म्हणजे शत्रूराष्ट्राच्या हेर महिलेने प्रेमाच्या जाळ्यात फसवून संबंधित व्यक्तीकडून सैन्यातील गोपनीय माहिती हस्तगत करण्यासाठी आखलेले षड्यंत्र !)
पणजी, २० मे (वार्ता.) – गोव्यात ‘गोवा शिपयार्ड’मध्ये काम करणारा पिप्राच, गोरखपूर, उत्तरप्रदेश येथील राम सिंह (वय ३१ वर्षे) या व्यक्तीने भारतीय नौसेनेच्या लढाऊ जहाजांची गोपनीय आणि महत्त्वाची माहिती पाकिस्तानच्या एजंटला पाठवली होती. या प्रकरणी उत्तरप्रदेश आतंकवादविरोधी पथकाने संशयित राम सिंह याला कह्यात घेतले आहे. तो एका महिलेच्या ‘हनी ट्रॅप’ला बळी पडल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी संशयितांच्या विरोधात लक्ष्मणपुरी येथील पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेचे कलम १२१ (अ) (भारत देशाच्या सरकारच्या विरोधात युद्ध करण्याचा प्रयत्न करणे) अंतर्गत प्रथमदर्शनी अहवाल नोंदवण्यात आला आहे.
उत्तरप्रदेश आतंकवादविरोधी पथकाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार संशयित गोव्यात ‘गोवा शिपयार्ड’मध्ये कामाला होता. गोवा शिपयार्डमध्ये भारतीय नौसेनेची ‘आय.एन्.एस्. विक्रमादित्य’, ‘आय.एन्.एस्. विक्रांत’, ‘स्वर्ण’, ‘सुभद्रा’ आदी लढाऊ जहाजे आणली जात होती. संशयित गोवा शिपयार्डमध्ये ‘मर्कुरी शिप’ या विभागात ‘इन्सुलेशन’चे काम करत होता. प्रारंभी संशयिताला कीर्ती हे ‘प्रोफाइल’ नाव असलेल्या एका महिलेने ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ (मैत्री करण्याची विनंती) पाठवली आणि यानंतर संशयिताचे ‘कीर्ती’ समवेत मैत्रीचे संबंध निर्माण झाले आणि यामध्ये काही मास गेले. त्यानंतर महिलेने संशयिताला शिपयार्डमध्ये येणारे नौसेना अधिकारी आणि जहाजे यांची छायाचित्रे पाठवण्यास सांगितले अन् ही छायाचित्रे तिने ‘आय.एस्.आय.’ या पाकिस्तानच्या गुप्तचर संघटनेच्या दलालांना पाठवली. संशयिताला त्याच्या अधिकोषामध्ये विविध अधिकोषांच्या संशयास्पद खात्यावरून पैसे येत होते. संशयिताच्या ‘आय.एस्.आय.’ हस्तकाशी असलेल्या संपर्कासंबंधी अन्वेषण यंत्रणा अधिक अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिका
|