संतांनी वापरलेला ‘मेडिकल टेप’चा (‘ल्युकोपोर’चा) तुकडा आध्यात्मिक लाभासाठी कुंडलिनीचक्रावर लावल्यावर त्रासदायक शक्तीचे आवरण जलद गतीने न्यून होणे
(‘ल्युकोपोर’ म्हणजे ‘जखमेवर केलेले बँडेज’ चिकटवण्यासाठी, तसेच अन्य काही वैद्यकीय उपचार करतांना वापरण्यात येणारी कागदी चिकटपट्टी [मेडिकल टेप])
‘मला २६.८.२०२३ या दिवशी संतांनी वापरलेल्या ‘ल्युकोपोर’चे काही तुकडे आध्यात्मिक लाभ होण्यासाठी मिळाले. त्यातील एक तुकडा मी माझ्या आज्ञाचक्रावर लावला. हे मी विसरून गेलो. नंतर नामजप करायला बसल्यावर मी आज्ञाचक्रावर न्यास केला. तेव्हा अन्य दिवसांच्या तुलनेत माझ्यावर आलेले त्रासदायक शक्तीचे आवरण जलद गतीने न्यून झाले. मला प्रथम आश्चर्य वाटले. नंतर माझ्या लक्षात आले, ‘संतांनी वापरलेल्या ‘ल्युकोपोर’चा तुकडा मी आज्ञाचक्रावर लावला होता. त्यामुळे आवरण जलद गतीने न्यून होत आहे.’
‘भगवन् (परात्पर गुरु डॉ. आठवले) आपण करत असलेल्या संशोधनामुळे आम्हाला अनिष्ट शक्तींच्या त्रासाचे निवारण होण्यासाठी अनेक गोष्टी उपलब्ध झाल्या आहेत. आपल्या कृपेमुळे आमचा आध्यात्मिक त्रास न्यून होत आहे, यासाठी आम्ही सर्व साधक आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत. ‘भगवन्, आपण दाखवलेल्या मार्गावर वाटचाल करता येऊन आमच्या जीवनाचे कल्याण व्हावे’, हीच आपल्या चरणी प्रार्थना !
– श्री. धैवत विलास वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी,गोवा. (२९.८.२०२३)
|