सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील कॅफेंची पडताळणी चालू !
कारवाईच्या धसक्याने कॅफेंना टाळे !
सांगली, २० मे (वार्ता.) – शहरातील विश्रामबाग परिसरातील अनधिकृत कॅफेत गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी ‘हँग ऑन’ कॅफेसह ३ कॅफेंची तोडफोड केली होती. (कॅफे म्हणजे कॉफी मिळण्याचे छोटे उपाहारगृह) त्यानंतर झोपेतून जागे झालेले महापालिका प्रशासन आणि पोलीस अधिकारी यांनी २० मेपासून शहरातील कॅफेंची पडताळणी चालू केली आहे. तथापी कारवाईच्या धसक्याने १८ मेपासून शहरातील अनेक कॅफेंना टाळे लागले आहे.
शहरात कॅफेची दुकाने वाढली आहेत. कॅफेतील बंदिस्त खोल्या, पडद्याआड असणारे कॅफेतील असभ्य वर्तन आणि लैंगिक प्रकार यांविषयी श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष श्री. नितीन चौगुले यांनी सतत आवाज उठवला; मात्र त्यांच्या मागण्यांकडे महापालिका प्रशासन आणि पोलीस अधिकारी यांनी दुर्लक्ष केले. श्री. चौगुले यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री, विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक यांना वारंवार निवेदन देऊनही त्यांनी याकडे कानाडोळा केला.
कॅफेची तोडफोड केल्याचे वृत्त माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर विविध संघटना आणि राजकीय पक्ष यांच्या नेत्यांनी अनधिकृत कॅफेवर कारवाई होण्यासाठी आंदोलनाची चेतावणी दिली. ‘पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळेच हे अनधिकृत कॅफे चालू आहेत’, असा आरोप नेत्यांनी केला. महापालिकेकडून या कॅफेंना व्यवसाय परवाना दिला जातो. याविषयी महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी याची नोंद घेतली. आता महापालिका आणि पोलीस नेमकी अनधिकृत कॅफेवर कशी कारवाई करतात ? हे यशावकाश समोर येईल; मात्र सध्या कॅफेंना टाळे असल्याने कॅफे मालकांवर कारवाई होईल कि नाही, हे पहावे लागेल.