सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव म्हणजे साधकांचा आनंदोत्सव !
‘११.५.२०२३ या दिवशी फर्मागुडी, गोवा येथे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ८१ वा जन्मोत्सव महर्षींच्या आज्ञेनुसार ‘ब्रह्मोत्सव’ म्हणून साजरा करण्यात आला. शत प्रतिशत व्यापक, सागराइतकी प्रीती आणि करुणामय असलेले सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव यांचा ‘न भूतो न भविष्यति ।’, असा ब्रह्मोत्सव ‘याची देही, याची डोळा’ अनुभवण्याची संधी आम्हा सर्व साधकांना मिळाली होती. ते अनुभवल्यानंतर मला गुरुकृपेने सुचलेले विचार येथे मांडले आहेत.
१. सज्जनांच्या रक्षणासाठी भगवंत आणि संत यांचे अवतारी कार्य
‘आपण आपल्या विविध पौराणिक कथांमध्ये प्रत्येक युगातील अवतारी पुरुषांचे अवतारी कार्य वाचले आणि ऐकलेही आहे. प्रत्येक युगात भगवंताने दुर्जनांचा नाश आणि साधकांच्या रक्षणासाठी अवतार घेऊन सज्जनांचे रक्षण केल्याचे आपण समजून घेतले आहे. सनातन धर्माचे पुनरुत्थान आणि त्याच्या उत्कर्षासाठी कलियुगातही पुष्कळ साधू-संतांनी आणि महापुरुषांनी जन्म घेऊन धर्माचे रक्षण करण्याचे कार्य हाती घेतले आहे. अविनाशी अशा सनातन हिंदु धर्माच्या रक्षणासाठी भगवंत अनेक ठिकाणी अवतार घेऊन त्याचे कार्य सतत करत आहे. हे कार्य करतांना भगवंताने वेगवेगळ्या कार्यपद्धतींचा उपयोग केला असला, तरी त्यांचा उद्देश एकच असतो. गीतेत श्रीकृष्णाने सांगितल्यानुसार धर्माला ग्लानी आल्यावर ‘मी पुनःपुन्हा अवतार घेईन’, हे भगवंताचे वचन सिद्ध झाल्याची आपण अनुभूती घेतो.
२. कलियुगातील अवतारी गुरु सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
आता आपण कलियुगांतर्गत कलियुगाच्या सत्ययुगात प्रवेश करत आहोत. सर्वत्र धर्माचे अधःपतन होत असलेले आपण उघड्या डोळ्यांनी पहात आणि अनुभवत आहोत. या संधीकाळात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या रूपात आपल्याला भगवंताने अवतारी गुरु दिले आहेत. सप्तर्षींनी नाडीपट्टी भविष्यात सांगितल्याप्रमाणे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव श्रीविष्णूचे अवतार आहेत. ते साधकांना ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ हा पंचम वेद देऊन कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग यांच्या माध्यमातून मोक्षाची वाट दाखवत आहेत. ‘गुरूंनी दिलेले ज्ञान प्राप्त करून भक्तीने सेवा कशी करायची ?’, हे गुरुदेव साधकांना सांगून ‘आम्हा सर्वांना साधनेच्या पुढच्या टप्प्याला घेऊन जात आहेत’, हे आपण सर्व साधक अनुभवत आहोत.
३. साधकांवर प्रेमाचा वर्षाव करणे
गुरुदेव ‘सातत्याने साधकांकडून साधना कशी होईल ?’, या एकाच उद्देशाने प्रयत्नरत राहून आपल्या साधकांवर प्रीतीचा वर्षाव करत आले आहेत. या साधनामार्गातून आपल्या आध्यात्मिक शक्तीचा साधकांवर पूर्णतः वर्षाव करून त्यांचा उद्धार होत असल्याचे पहात आहेत. गुरुदेव स्वत:च्या जन्मदिनानिमित्त झालेल्या ब्रह्मोत्सवात सर्व साधकांना प्रत्यक्षात पाहून आनंदी झालेले होते. हे पाहून आम्हा सर्वांची भावजागृती होत होती. त्याचा एक भाग म्हणजे, ११.५.२०२३ या दिवशी झालेला गुरूंचा ब्रह्मोत्सव साधकांना साधनेसाठी शक्ती देणारा एक मोठा उत्सवच होता. गुरुदेवांकडून प्राप्त झालेल्या गुरुकृपायोगानुसार साधनामार्गावर सिद्ध झालेल्या आपल्या साधकांना पाहून गुरुदेवांना इतका आनंद झाला की, अन्य वेळी इतका आनंद कधीच झाला नसेल. अनेक राज्यांमधून साधक गुरुदेवांचा ब्रह्मोत्सव पहाण्यास तळमळीने आले होते. आपल्या जीवनात साक्षात् विष्णूचा अवतार असलेल्या गुरुदेवांचा ब्रह्मोत्सव बघण्याचे भाग्य साधकांना लाभले, ही गुरुकृपाच आहे.
४. ब्रह्मोत्सवाचा दैवी कार्यक्रम
११.५.२०२३ या दिवशी झालेला ब्रह्मोत्सवही संपूर्ण पृथ्वीवर हिंदु राष्ट्र स्थापन करण्याच्या संकल्पाचा एक दैवी कार्यक्रम होता. ‘ब्रह्मोत्सव कसा असेल ?’, याची कल्पना नसलेल्या साधकांना ‘गुरुदेवांनी प्रत्यक्षात त्यांच्या उत्तराधिकारी असलेल्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्यासह रथारूढ होऊन आम्हाला आनंद दिला’, हे आमचे परम भाग्यच म्हणावे लागेल. गुरुदेवांचे मन किती व्यापक आहे ! ‘गोव्यात झालेला हा एक दैवी कार्यक्रम माझ्या सर्व साधकांना बघायला मिळाला पाहिजे आणि त्यातील चैतन्याचा लाभ अन् अनुभव सर्वांनी घेतला पाहिजे’, या इच्छेने गुरुदेवांनी शक्य तेवढ्या अधिक साधकांना या कार्यक्रमात सहभागी करून घेण्याचे नियोजन केले. उच्च लोकात हा कार्यक्रम होत असल्याची अनुभूती देणारा हा ब्रह्मोत्सव ! सर्वत्रच्या साधकांच्या ‘न भूतो न भविष्यति ।’ असा कार्यक्रम बघण्याच्या उत्सुकतेला मर्यादाच नव्हती.
५. ‘गुरुदेव, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आसनस्थ झालेला ब्रह्मरथ’ साधकांनी देहभान विसरून भावावस्थेत पहाणे
सागराला मिळाल्याप्रमाणे सगळीकडून आलेले साधक हा ब्रह्मोत्सव होत असलेल्या ठिकाणी गुरुदेवांना ब्रह्मरथात आसनस्थ असलेले निरखण्यात तन्मय झाले होते. गुरुदेव आणि श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ, श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ आसनस्थ झालेला ब्रह्मरथ पाहून सर्व साधकांच्या डोळ्यांतून धन्यतेच्या आनंदाचे भावाश्रू दाटून त्यांचा वर्षाव होऊन ते संपूर्ण भावावस्थेत गेले. साधक आपले देहभान विसरून एकाग्र चित्ताने ब्रह्मोत्सवाचे निरीक्षण करत असलेली ती घटिका अद्भुत होती. हे दृश्य पहाण्यासाठी शेकडो नेत्रही अपुरे पडले असते. हे दृश्य पहाणारे गुरुदेव आणि गुरुमाताद्वयीही भावाच्या स्थितीत गेलेले पहातांना आम्हा सर्व साधकांच्या आनंदाश्रूंना मर्यादाच उरली नाही.
६. ‘रथ आकाशात भ्रमण करत असून तो सर्व साधकांना आपल्याकडे आकर्षून घेत आहे’, असे भासणारे अद्भुत दृश्य दिसणे
‘रथ आकाशात भ्रमण करत आहे आणि तो सर्व साधकांना आपल्याकडे आकर्षून घेत आहे’, असे भासणारे दृश्य अद्भुत होते. रथाच्या आणि रथात आसनस्थ गुरुदेवांच्या चैतन्यामुळे सर्व वातावरणच पालटून गेले होते. सर्व परिसर पिवळ्या आणि गुलाबी रंगाचा झाला होता. आम्ही कधीच न बघितलेला असा आकाशाचा रंगही पिवळसर आणि केशरी रंगांनी भरलेला होता. या चैतन्यामुळे संपूर्ण भूमंडलातील अनिष्ट शक्तींचे समूळ उच्चाटन झाल्याचे भासत होते.
७. अनिष्ट शक्तींच्या त्रासांपासून साधकांना मुक्त करणारा ब्रह्मोत्सव
रथारूढ कृष्ण आणि अर्जुन यांनी कौरव सेनेला कुरुक्षेत्रावरील युद्धात उद्ध्वस्त केले. त्याच प्रकारे ‘गुरुदेवांनी रथारूढ होऊन भ्रमण करत असतांना सर्व अनिष्ट शक्तींची शक्ती नष्ट करून साधकांना होत असलेल्या त्रासांमधून मुक्त केले’, असे आम्ही सूक्ष्मातून अनुभवत होतो. श्रीकृष्णाने अर्जुनाला भावनात्मकतेमुळे आलेल्या सर्व विकल्पांचे गीतेच्या माध्यमातून संदेह निवारण केल्याप्रमाणे गुरुदेव वेळोवेळी संदेह निवारण करून साधकांना साधनेत पुढच्या पुढच्या टप्प्याला घेऊन गेले आहेत. ‘गुरुदेव या एका कार्यक्रमातून सर्व साधकांना चैतन्य देऊन साधना करवून घेत आहेत’, अशी अनुभूती पुष्कळ साधकांना आली आहे. हा दैवी ब्रह्मोत्सव असल्याने गुरुकृपेने याचे पूर्ण नियोजन साधक अनुभवत होते.
८. तिरुपतीच्या ब्रह्मोत्सवाची आठवण करून देणारा ब्रह्मोत्सव !
श्रीक्षेत्र तिरुपती येथे श्री व्यंकटरमण देवाच्या ब्रह्मोत्सवाची आठवण करून देणारा हा ब्रह्मोत्सव होता. तिरुपती येथे व्यंकटरमण श्रीभूदेवी आणि श्रीदेवी यांच्यासह ब्रह्मोत्सवात भक्तांना भेटतो. तसा आजच्या या ब्रह्मोत्सवातही श्रीविष्णूचा अवतार असलेल्या गुरुदेवांनी भूदेवी आणि श्रीदेवी यांच्यासह आम्हा सर्व साधकांना दर्शन दिले. हे आम्हा सर्व साधकांचे सद्भाग्यच म्हणावे लागेल. साधकांचा भाव आणि भावाश्रू यांमुळे सर्व अनिष्ट शक्तींचे त्रास नष्ट झाल्याने साधक कृतार्थ झाले. यापुढेही ‘ब्रह्मोत्सवाच्या केवळ स्मरणाने साधकांना वाईट शक्तींमुळे होणार्या त्रासांचे निवारण होणार आहे’, असा विचार मनात येत होता. ब्रह्मोत्सवात गुरुदेवांनी आमची व्यवस्था केली, तसेच विविध अनुभव आणि अनुभूती आल्यामुळे साधक कृतार्थ झाले. आम्हाला साधनेत विविध प्रकारे हात धरून पुढे घेऊन जाणार्या गुरुदेवांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्याची ही एक संधी साधकांना लाभली.
९. ब्रह्मोत्सव म्हणजे गुरूंच्या कृपेचा एक भाग !
हा केवळ गुरूंच्या कृपेचा एक भाग आहे, इतकेच. हे ईश्वरी राज्याच्या स्थापनेसाठी गुरुदेवांनी टाकलेले आणखी एक पाऊल आहे. ‘ईश्वराच्या नियोजनाचा भाग आम्हा अज्ञानी जिवांना कसा कळावा ? ‘गुरुदेवांना आम्हा सर्वांना आनंद आणि ब्रह्मरथोत्सवाचे चैतन्य प्रदान करून द्यायचे होते. ही सर्व स्थुलातील प्रक्रिया आहे; परंतु सूक्ष्मातून आणखी किती प्रक्रिया घडल्या आहेत ?’, हे केवळ गुरुदेवांनाच ठाऊक आहे. ‘सूक्ष्मातून ब्रह्मांडात काय पालट झाले आहेत ?’, हे सामान्य मानव असणारे आपण समजू शकत नाही. ‘सर्व साधकांना यामुळे आनंद आणि चैतन्य याची अनुभूती येणे’, ही गुरुदेवांची कृपाच आहे. (क्रमश:)
– कृष्णार्पणमस्तु,
(पू.) उमेश शेणै, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१.६.२०२३)
|
याच्या नंतरचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/795980.html