नाशिक येथे अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांच्यावर गुन्हा नोंद !
नाशिक – येथून महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे, महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे आणि अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांनी मतदानाचा हक्क बजावला; मात्र शांतीगिरी महाराजांवर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यांनी मतदान केल्यावर स्वतःच्या गळ्यातील हार इव्हीएम् यंत्राला घातला. त्याआधी त्यांनी मतदान केंद्राबाहेर बेलफुलाने पूजा करून वंदन केले होते. असे करणे म्हणजे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला. मतदान केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधतांना शांतीगिरी महाराज म्हणाले की, आम्ही सर्वांत देव बघतो. इव्हीएम् यंत्रातही देव आहे. मतदान केंद्र हे पवित्र ठिकाण असून आम्ही शुद्ध भावनेतून पूजा केली. मी इव्हीएम्ला हार घातला नाही. कक्षात असलेल्या भारतमातेच्या चित्राला हार घातला.