Gopi Thotakura Space Tourist : पर्यटक म्हणून अंतराळात जाणारे पहिले भारतीय ठरले गोपी थोटाकुरा !
‘ब्लू ओरिजिन’ आस्थापनाच्या रॉकेटमधून केला अंतराळात प्रवास !
ह्युस्टन (अमेरिका) – गेल्या २-३ वर्षांपासून अमेरिकेत ‘अंतराळ पर्यटना’वर भर दिला जात आहे. विशेषतः खासगी आस्थापनांत यासाठी चढाओढ चालू आहे. त्याचा उद्देश सर्वसामान्यांना अंतराळ स्थानकात नेणे, हा आहे. ‘अमेझॉन’चे संस्थापक जेफ बेझोस यांचे आस्थापन ‘ब्लू ओरिजिन’ने १९ मे या दिवशी ‘न्यू शेपर्ड रॉकेट’च्या साहाय्याने ६ जणांना अवकाशात पाठवले. यामध्ये आंध्रप्रदेशातील गोपी थोटाकुरा यांचाही समावेश होता. यामुळे ३० वर्षीय गोपी हे ‘पर्यटक’ म्हणून अंतराळात जाणारे पहिले भारतीय ठरले आहेत. वर्ष १९८४ मध्ये भारतीय सैन्याचे विंग कमांडर राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळात जाणारे दुसरे भारतीय ठरले.
१. गोपी थोटाकुरा यांच्या व्यतिरिक्त मेसन एंजेल, सिल्वेन चिरॉन, केनेथ एल्. हेस, कॅरोल स्कॉलर आणि अमेरिकेच्या सैन्यातील माजी कॅप्टन एड ड्वाइट यांचाही यात समावेश होता.
२. इलॉन मस्क यांचे आस्थापन ‘स्पेसएक्स’शी स्पर्धा करणार्या ‘ब्लू ओरिजिन’ने याआधीही ‘न्यू शेपर्ड रॉकेट’मधून ३१ जणांना अंतराळात नेले आहे. अंतराळात जाणारे पहिले अमेरिकी अंतराळवीर लन शेपर्ड यांच्या नावावरून या रॉकेटला ‘न्यू शेपर्ड रॉकेट’ असे नाव देण्यात आले आहे.
३. १२ सप्टेंबर २०२२ या दिवशी ‘अंतराळ पर्यटना’ची पहिली मोहीम हाती घेण्यात आली होती. तेव्हा काही सेकंदांनंतर रॉकेटला आग लागली. त्यानंतर डिसेंबर २०२३ मध्ये त्याची पुन्हा चाचणी घेण्यात आली. यानंतर १९ मेच्या सायंकाळी अमेरिकेतील टेक्सास शहरातून या रॉकेटने आकाशात भरारी घेतली.
कोण आहेत गोपी थोटाकुरा ?
गोपी एक वैमानिक आणि उद्योजक आहेत. त्यांनी फ्लॉरिडा येथील ‘एम्ब्री-रिडल एअरोनॉटिकल विद्यापिठा’तून पदवी प्राप्त केली असून दुबईतील ‘एमिरेट्स एव्हिएशन विद्यापिठा’मध्ये ‘एव्हिएशन मॅनेजमेंट’चा अभ्यास केला आहे. विशेष म्हणजे गोपी हे चारचाकी वाहन चालवण्याआधी विमान चालवायला शिकले आहेत.
असा असतो अंतराळातील प्रवास !पृथ्वीपासून १०० किमी उंच रॉकेट नेले जाते. या अंतरावरून पर्यटकांना त्यांचे सीट बेल्ट काढून पृथ्वीकडे पहाता येते. एवढ्या अंतरावर पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण अत्यल्प असल्याने पर्यटकांना शून्य वजन झाल्याचा (‘वेटलेसनेस’चा) अनुभव घेता येतो. हा कालावधी साधारण ११ मिनिटांचा असतो. हा एक अविस्मरणीय अनुभव असल्याचे ‘ब्लू ओरिजिन’चे म्हणणे आहे. |