Artificial Intelligence : लोकांना मारण्याचा निर्णय ‘ए.आय.’कडून स्वतःहून घेतला जाऊ शकतो !

‘कृत्रिम बुद्धीमत्ते’चे (ए.आय.चे) जनक डॉ. जेफ्री हिंटन यांनी व्यक्त केली भीती

कृत्रिम बुद्धीमत्तेविषयीचे प्रातिनिधीक छायाचित्र

नवी देहली – कृत्रिम बुद्धीमत्ता (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) या तंत्रज्ञानामुळे  मानव जमातीसमोर विलुप्त होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो; कारण आपण जैविक बुद्धीमत्तेपेक्षा अधिक चांगली बुद्धीमत्ता सिद्ध केलेली असेल. हे आपल्यासाठी अधिक चिंताजनक आहे. तसेच लोकांना मारण्याचा निर्णय ए.आय.कडून स्वतःहून घेतला जाऊ शकतो, अशी भीती या तंत्रज्ञानाचे जनक असणारे डॉ. जेफ्री हिंटन यांनी व्यक्त केली आहे. गेल्या वर्षी डॉ. हिंटन यांनी गूगल आस्थापनातून नोकरीचे त्यागपत्र दिले होते. ‘माझा अंदाज आहे की, आतापासून ५ ते २० वर्षांपर्यंत ए.आय.वर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न होईल’, असेही ते म्हणाले.

डॉ. जेफ्री हिंटन

हिंटन म्हणाले की, ए.आय.मुळे अनेक लोकांना नोकर्‍या गमवाव्या लागू शकतात. तसेच ए.आय.मुळे लोकांच्या उत्पन्नात असमानता दिसू शकते. त्यामुळे सरकारने याच्याशी संबंधित उपाययोजना हाती घ्यावी.

ए.आय.मुळे श्रीमंतांच्या संपत्तीत वाढ होईल !

हिंटन पुढे म्हणाले की, ए.आय.मुळे कार्यक्षमता आणि संपत्ती वाढण्यास नक्कीच साहाय्य होईल; पण हा पैसा श्रीमंत लोकांकडे जाईल अन् ज्यांच्या नोकर्‍या गेल्या आहेत, त्यांची हानी होईल. यामुळे समाजाला मोठी हानी पोचू शकते. सरकारने वैश्‍विक मूलभूत वेतनासंबंधीचे काही निकष ठरवायला हवेत. त्यामुळे नोकरदारांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळू शकतील.