Anti-Indian European Media : युरोपीयन प्रसारमाध्यमे भारताविषयी खोट्या बातम्या प्रसारित करतात ! – ब्रिटीश पत्रकार सॅम स्टीव्हन्सन

ब्रिटीश पत्रकार सॅम स्टीव्हन्सन

नवी देहली – लंडन आणि संपूर्ण युरोप येथील प्रसारमाध्यमे भारताविषयी नकारात्मक गोष्टी प्रसारित करत आहेत, अशी माहिती ब्रिटीश पत्रकार सॅम स्टीव्हन्सन यांनी दिली. सॅम स्टीव्हन्सन सध्या लोकसभा निवडणुकीच्या बातम्यांना प्रसिद्धी देण्यासाठी भारतात आले आहेत.

पत्रकार स्टीव्हन्सन पुढे म्हणाले,

१. युरोपीयन प्रसारमाध्यमांकडून भारतात धार्मिक विभाजन केले जात असल्याचे सांगून अशा गोष्टी रंगवून सांगितल्या जात आहेत; पण प्रत्यक्षात तसे कुठेच दिसत नाही. उलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांमध्ये मुसलमान महिला बुरखा घालून येतांना दिसत आहेत.

२. ब्रिटीश प्रसारमाध्यमे म्हणतात की, मोदी इस्लामविरोधी आहेत; पण जेव्हा ब्रिटीश प्रसारमाध्यमे भारतभूमीत येऊन मुसलमान, हिंदू, शीख आदींशी बोलतील, तेव्हा त्यांना दिसेल की, भारत सर्व संस्कृती किंवा धर्म स्वीकारत आहे.

३. भारतासारख्या महान आणि अद्भूत देशामध्ये एकात्मता दिसून येते. या राष्ट्राविषयी सत्यस्थिती ब्रिटीश प्रसारमाध्यमांत प्रसारित करण्यासाठी मी येथे आलो आहे. मी सत्यापर्यंत पोचण्यासाठी, तसेच काही तथ्ये शोधण्यासाठी आणि अशा गोष्टींना लंडनमध्ये प्रसिद्धी देण्यासाठी येथे आलो आहे. भारताविषयी अनेक सकारात्मक बातम्या आहेत, ज्या जगाला सांगणे आवश्यक आहे.

४. संपूर्ण युरोप आणि पाश्‍चिमात्य देश यांची भारताविषयी चुकीची धारणा आहे. तेथे भारताविषयी नकारात्मक गोष्टी सांगितल्या जातात. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. या लोकांनी भारतात यावे आणि सर्व गोष्टी स्वतःच्या डोळ्यांनी पहाव्यात. येथील तळागाळातील लोकांशी बोलावे. मग त्यांना त्यांची धारणा चुकीची असल्याचे लक्षात येईल. भारत आणि ब्रिटन हे दोन्ही देश सर्वांच्या भल्यासाठी जागतिक शक्ती बनू शकतात. दोन्ही देशांना संस्कृती, वारसा आणि इतिहास यांची देणगी आहे.