शिवसेनेचे उपतालुका प्रमुख विनायक एडके यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या विरोधातील लढ्याला यश !
बनावट नळजोडणी आणि आर्थिक गैरव्यवहार यांविषयी आज महापालिका आयुक्तांना निवेदन देणार !
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेतील ४ भ्रष्ट कर्मचार्यांना निलंबित केल्याचे प्रकरण
सांगली, १९ मे (वार्ता.) – येथील आमराई परिसरातील रहिवासी भावेश शहा यांसह सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील २८५ अवैध नळजोडणी प्रकरणी महापालिका कार्यालयातील ३ कर्मचार्यांना निलंबित, तर एका कर्मचार्यास कार्यमुक्त करण्यात आले आहे. या प्रकरणी शिवसेनेचे मिरज उपतालुका प्रमुख विनायक येडके यांनी सतत २ महिने अनेकदा निवेदने देऊन उपोषण आणि आंदोलन यांचा मार्ग अवलंबल्यानंतर महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी कर्मचार्यांवर ही कारवाई केली आहे. महापालिकेतील भ्रष्टाचार आणि अपप्रकार यांच्या विरोधात सतत पाठपुरावा करून हे प्रकरण तडीस लावल्याविषयी श्री. विनायक येडके यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
विशेष म्हणजे श्री. विनायक येडके यांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील दोषी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी १६ मे या दिवशी उपोषण केले होते. त्यांनी कशा पद्धतीने अनागोंदी कारभार चालू आहे, हे निवेदनातून विशद केले होते. शेवटी महापालिकेच्या आयुक्तांनी याची नोंद घेऊन कर्मचार्यांवर कारवाई केली. (महापालिकेत काय गैरप्रकार चालू आहे, हे प्रशासनाला कळत नाही का ? त्यासाठी नागरिकांना उपोषण का करावे लगाते ? – संपादक)
पाणीपुरवठा विभागातील संबंधित कर्मचारी आणि अधिकारी यांची खातेनिहाय चौकशी करावी !
या संदर्भात दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना श्री. विनायक येडके म्हणाले, ‘‘या अवैध नळजोडणी प्रकरणाची व्याप्ती आणि संगनमत यांनी चाललेला भ्रष्टाचार हे केवळ हिमनगाचे टोक असून संबंधित कर्मचारी आणि अधिकारी यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी, तसेच महापालिका क्षेत्रातील अवैध नळजोडणीचे सर्वेक्षण करून हे सर्व प्रकरण उघडकीस आणावे, अशी मागणी केली आहे; मात्र महापालिका प्रशासनाकडून हेतूपुरस्सर याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.’’
बनावट नळजोडणी आणि आर्थिक व्यवहार यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी !
श्री. विनायक येडके पुढे म्हणाले, ‘‘पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी बनावट पद्धतीने नळजोडणी करत आहेत. अशा बनावट नळजोडण्या महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आहेत. अंबाईनगर आमराई शेजारी भावेश शहा नावाच्या मोठ्या व्यापार्याला कोणतेही परवाना आवेदन नसतांना, तसेच पाणीपुरवठा अधिकार्याला न कळवता पाणीपुरवठा कार्यालयातील कर्मचारी नितीन आळंदे यांच्या सांगण्यावरून ‘फिटर’ आणि इतर कर्मचारी यांच्या संगनमताने आर्थिक देवाण-घेवाण करून बनावट नळजोडणी केली आहे. आम्ही ही गोष्ट अधिकार्यांच्या दृष्टीस आणून दिली. त्यानंतर भावेश शहा यांनी पाणीपुरवठा कार्यालयात नळ जोडणीसाठी आवेदन केले आहे. हे आवेदन अमान्य करण्यात यावे, तसेच बनावट नळजोडणी घेणारा ग्राहक आणि तो देणारा अधिकारी यांची खातेनिहाय चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. बनावट नळजोडणी आणि आर्थिक गैरव्यवहार यांविषयी २० मे या दिवशी महापालिकेच्या आयुक्तांना निवेदन देणार आहे.’’
संपादकीय भूमिका :महापालिकेतील बनावट नळजोडणी आणि भ्रष्टाचार यांच्या विरोधात सतत पाठपुरावा करून आवाज उठवणारे श्री. विनायक येडके यांचे अभिनंदन ! यातून बोध घेऊन अशी कृती प्रत्येक शहरातील सर्व पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक यांनी करणे अपेक्षित आहे. महापालिकेला त्यांच्याकडे काय चालू आहे, हे कळत कसे नाही ? |