‘कॅफे’ संस्कृती त्वरित न थांबवल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू ! – राष्ट्रवादीचे आमदार अरुण लाड यांची चेतावणी
सांगली, १९ मे (वार्ता.) – जिल्ह्यात ‘कॅफे’च्या नावाखाली अश्लील चाळे होत आहेत. शहरातील एका कॅफेत गुंगीचे औषध देऊन मुलीवर अत्याचार करून व्हिडिओ काढले जातात. हा प्रकार गंभीर आहे. सुसंस्कृत सांगली येथे पोलीस आणि प्रशासन यांच्या पाठबळानेच असले धंदे चालू आहेत. अवैध धंद्यांवर पोलिसांचा वचक नाही. पोलीस हप्ते घेत असल्यानेच कारवाई होत नाही. शहरासह गल्लीबोळात चालू झालेली ‘कॅफे’ संस्कृती त्वरित थांबवावी. संबंधितांवर कारवाई करावी, अन्यथा या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, अशी चेतावणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अरुण लाड यांनी दिली आहे.
पोलिसांनी कारवाई न केल्याने श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी केले त्यात गैर काय ?
आमदार अरुण लाड म्हणाले, ‘‘सांगलीत ‘कॅफे’च्या नावाखाली भयानक प्रकार चालू आहे. अल्पवयीन मुलींना आमीष दाखवून त्यांना ‘कॅफे’त नेऊन गैरप्रकार केले जातात. पोलिसांनी पैसे खाल्ले, तर कारवाई कशी होणार ? ते (गुन्हेगार) मोकाटच सुटणार. माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. कॅफे चालकांवर धाक ठेवण्याचे काम प्रशासन करत नाही म्हणून श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. पोलीस अवैध धंद्यांवर कारवाई करत नसतील, तर श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे अध्यक्ष श्री. नितीन चौगुले यांनी कारवाई केली, तर त्यात गैर काय ? ‘पोलीस आम्हाला नको’, अशी म्हणायची वेळ आता येईल.’’