देवपूजा आणि नामजप भावपूर्ण करणारे अन् सर्वांशी आदराने बोलून त्यांच्याशी जवळीक साधणारे फोंडा, गोवा येथील श्री. नीलेश पाध्ये !
फोंडा, गोवा येथे रहाणारे श्री. नीलेश पाध्ये यांची त्यांच्या आई-वडिलांच्या लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. नम्र आणि सेवाभावी वृत्ती
‘नीलेश वयस्करांशी नम्रतेने आणि आदराने बोलतो. त्याचे ‘आमची औषधे आणायची आहेत का ? आम्ही औषधे घेतली आहेत का ?’, याकडे लक्ष असते. तो आमच्या प्रकृतीची काळजी घेतो.
२. देवपूजा भावपूर्ण करणे
तो नियमित घरातील देवपूजा भावपूर्ण करतो. त्याने देवांना कधी फुले वाहिली नसतील, तरीही त्याने पूजा केल्यावर ‘देवघराकडे पहात रहावे’, असे वाटते. तो पूजा झाल्यानंतर डोळे मिटून नामजप करतो. तेव्हा त्याच्याकडे पाहिल्यावर ‘तो देवाशी बोलत आहे’, असे आम्हाला जाणवते. त्याला कितीही कामे किंवा घाई असली, तरीही तो देवपूजा आणि नामजप करतो. तो वापरत असलेल्या जपमाळेला सुगंध येत आहे.
३. समाजातील व्यक्तींशी जवळीक साधणे
आमची लांजा, रत्नागिरी येथे शेतभूमी आहे. त्याला तेथे नेहमी जावे लागते. त्याने लांजा येथील लोकांशीही जवळीक साधली आहे. तो लांजा येथे गेला नाही, तर तेथील अनेक व्यक्ती त्याला भ्रमणभाष करून ‘तुम्ही का आला नाहीत ? आई-बाबांची प्रकृती कशी आहे ?’, अशी चौकशी करतात. त्याने आमच्या शेतात काम करणार्या मजुरांशी प्रेमाने बोलून त्यांना जोडून ठेवले आहे.’
– श्री. सुधाकर पाध्ये (श्री. नीलेश यांचे वडील )आणि सौ. अनघा पाध्ये (श्री. नीलेश यांची आई), फोंडा, गोवा. (१६.४.२०२४)